हंगा हे लंके यांचे मूळ गाव आहे. पारनेर तालुक्यातील सुपे औद्योगिक वसाहतीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी हंगा व सुपे गावच्या परिसरातील शेतजमीन देण्यास शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. हंगा येथील ८३५ तर सुपे येथील ८० हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. यासाठी हरकती व सुनावणीसाठी संबंधित शेतकऱ्यांना बोलविण्यात आले होते. एमआयडीसीचे विभागीय अधिकारी नितीन गळळी, पारनेरचे प्रांताधिकारी सुधाकर भोसले व तहसिलदार ज्योती देवरे यांच्यासमोर सुनावणी झाली. शेतकऱ्यांनी विशेषत: महिलांनी जमीन देण्यास नकार दिला आहे. सुमारे ३०० शेतकऱ्यांनी हरकती नोंदविल्या आहेत. दरवेळी आमच्या जमीनी का घेता? जमीन गेली तर संपूर्ण गावच भूमीहीन होणार आहे. आम्हाला पैसे नकोत, आमची जमीनच राहू द्या अशी मते शेतकऱ्यांनी मांडली.
हंगा गावातील शेती आणि पिण्याच्या पाणी योजनेचा तलावही यात जाणार आहे. यालाही सरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. यानंतरही अधिकाऱ्यांनी भूसंपादनाची कार्यवाही सुरू केली, तर आंदोलन केले जाईल, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.
पारनेर तालुक्यात सुपे येथे १९९२ मध्ये पहिल्या टप्प्यात ३०७ तर नंतर दुसऱ्या टप्प्यात ९४६ हेक्टरवर ही औद्योगिक वसाहत विस्तारली आहे. पुणे आणि औरंगाबादच्या मध्यावर असलेले हे राज्यातील सर्वांत मोठे आद्योगिक क्षेत्र होण्याच्या मार्गावर आहे.
भविष्यात सुपे परिसर हा राज्यातील एक मोठा औद्योगीक क्षेत्र असलेला परिसर होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील विकासात अनेक विदेशी कंपन्याही आल्या आहेत. तर तिसऱ्या टप्प्यात आयटी कंपन्यांचे नियोजन आहे.
नगर-पुणे महामार्गावर पुणे व औरंगाबाद एमआयडीसीपासूनही सुमारे शंभर किलोमीटवर हे क्षेत्र आहे. पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर, चाकण, रांजणगाव या एमआयडीसीपासून जवळ असल्याने सुपे हे औद्योगीकदृष्ट्या मध्यवर्ती ठिकाण बनले आहे. १९९२ मध्ये सुरू झालेल्या पहिल्या टप्प्यात अनेकांनी प्लॉट घेतले, मात्र तेथे उद्योग उभारले नाहीत. गेली अनेक वर्षांसून ते मोकळेच आहेत. नंतर म्हसणे फाटा येथे दुसरा टप्पा करण्यात आला. तेथे जापनीज हब या नावाने ९४६ हेक्टर जागा ठरविण्यात आली. त्यातील ८० टक्के जमीन संपादित झाली आहे. तेथे काही मोठे उद्योग सुरू झाले असून आणखी येण्यास इच्छूक आहेत. आता हा तिसरा टप्पा आयटी कंपन्यांसाठी सुरू करण्यात येत असून त्या भूसंपादनाचा अडथळा निर्माण झाला आहे. यापूर्वीच्या टप्प्यांनाही विरोध झाला होता, मात्र यावेळी त्याची तीव्रता अधिक आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times