अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (कॅट) २६ फेब्रुवारीला भारत बंदची हाक दिली आहे. आज सर्व व्यावसायिक बाजारपेठा बंद राहतील. माल वाहतूक क्षेत्रातील सर्वात मोठी संघटना ऑल इंडिया ट्रान्सपोर्टर्स वेलफेअर असोसिएशनने व्यापाऱ्यांच्या समर्थनार्थ सकाळी ६ ते संध्याकाळी ८ या वेळेत चक्का जाम जाहीर केला आहे. कोणत्याही प्रकारच्या वस्तूंचे बुकिंग, वितरण, माल भरणं आणि माल उतरवणं बंद राहील. या निषेधासाठी सर्व वाहतूकदार संघटनांना भारत बंद दरम्यान आपली वाहनं पार्क करण्यास सांगण्यात आलं आहे. देशभरातील विविध राज्यात निषेध म्हणून १५०० ठिकाणी निदर्शनं करण्यात येणार आहेत. यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
अनेक संघटना ‘भारत बंद’मध्ये सहभागी
देशातील वाहतूक क्षेत्रातील सर्वात मोठी संघटना ऑल इंडिया ट्रान्सपोर्टर्स वेलफेअर असोसिएशनने यापूर्वीच कॅटच्या व्यापाराला पाठिंबा दर्शवला आहे. तसंच देशभरात चक्का जामचा इशारा दिला आहे. याशिवाय अनेक राष्ट्रीय व्यापारी संघटनांनी व्यापाऱ्यांच्या या बंदला पाठिंबा दर्शवला आहे. विशेषत: ऑल इंडिया एफएमसीजी डिस्ट्रिब्यूटर्स फेडरेशन, फेडरेशन ऑफ अॅल्युमिनियम युटेन्सिलस मॅन्यूफॅक्चरर्स अँड ट्रेडर्स असोसिएशन, नॉर्थ इंडिया स्पाइसिस ट्रेडर्स असोसिएशन, अखिल भारतीय महिला उद्योजक संघटना, अखिल भारतीय संगणक डीलर असोसिएशन, ऑल इंडिया कॉस्मेटिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने या बंदला पाठिंबा दिला आहे.
आज काय काय असेल बंद?
२६ फेब्रुवारीला देशातील सर्व व्यावसायिक बाजारपेठा बंद राहतील. त्याचवेळी १ कोटी वाहतूकदारांनी २६ फेब्रुवारीला बंद आणि चक्का जामची घोषणा केली आहे. चार्टर्ड अकाउंटंट्स आणि टॅक्स अॅडव्होकेट्स असोसिएशनने देखील त्यांच्या ग्राहकांना शुक्रवारी कार्यालयात न येण्यास सांगितलं आहे. म्हणजे त्यांची कार्यालये देखील बंद ठेवली जातील. सुमारे १५०० ठिकाणी धरणे आंदोलन देखील केले जाईल.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times