संपदा जोशी
० बऱ्याच वर्षांनी मराठी मालिका करते, कसं वाटतंय?– आपल्या भाषेत काम करताना आपुलकी वाटते. मालिकेच्या निमित्तानं मराठी भाषेवर काम करता येतंय. कलाकाराच्या आयुष्यात चांगल्या भूमिका मिळणं हा नशिबाचाही भाग असतो. त्यामुळे एसीपी रेवती या भूमिकेसाठी विचारल्यावर मी लगेच होकार दिला. मधल्या काळात मी कोणाच्याही संपर्कात नव्हते आणि आता अचानक जुन्या मित्रमंडळींना भेटल्यावर फारच छान वाटतंय.

० पोलिस भूमिका साकारण्याचा अनुभव कसा आहे?– पोलिसाची भूमिका साकारताना थोडं दडपण असतं. बोलणं, वागणं, चालणं नीट होतंय ना हा विचार असतो. अशा भूमिकेचा साचा आधीच तयार असतो. कलाकाराला त्यात स्वतःला बसवायचं असतं. ही भूमिका उभी करण्यासाठी संपूर्ण टीमनं अभ्यास केला आहे आणि मला खूप मदत देखील केली.

० अभिनेत्री नसतीस तर कोण असतीस?– आयएएस किंवा आयपीएस अधिकारी असते. माझं अभिनयाचं करिअर खूप लवकर सुरू झालं आणि तो प्रवास पुढे घडत गेला. पण अभिनेत्री नसते तर नक्कीच एखादी सरकारी अधिकारी असते.

० कलाकाराच्या खासगी आयुष्यावर बऱ्याचदा चर्चा केली जाते. तुझं याबाबत काय मत आहे ?– खासगीपणा हवा असेल तर त्याची सुरुवात तुमच्यापासूनच करायला हवी. तुम्ही तुमच्या गोष्टी बाहेर कोणालाच सांगितल्या नाही, कुठेही फोटो शेअर केले नाहीत तर गोष्टी बाहेर जाणारच नाहीत. कलाकाराला लोकप्रियता, पीआर या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच पण ते किती प्रमाणात आणि कसं व्हायला हवं, हेही तितकच महत्त्वाचं आहे. तुम्ही लोकप्रिय व्यक्तिमत्व असता तेव्हा लोक तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही बोलणारच. त्याकडे दुर्लक्ष करायचं की उत्तर द्यायचं हे कलाकाराच्या हातात असतं. त्यामुळे सोशल मीडियावर काहीही पोस्ट टाकताना मी खूप चोखंदळ असते.

० सगळ्यात आवडतं माध्यम कोणतं ?– मला कोणत्याही माध्यमात आणि भाषेत काम करायला आवडतं. पण माझं लाडकं माध्यम जाहिरात हे आहे. माझ्या करिअरची सुरुवात मी तिथून केली. नेहमी नवीन पात्र, संकल्पना असते त्यामुळे काम करायला मजा येते. मी करत असलेलं काम मला मनापासून आवडायला हवं. एखादं पात्र मला आवडलं आणि ते मी स्वत: आहे असं वाटलं तरच मी ते काम स्वीकारते.

० ठरावीक चित्रपटांमध्येच दिसतेस. असं का?– चित्रपटासाठी बऱ्याचदा बाहेरगावीही जावं लागायचं. त्यावेळी माझी मुलगी लहान असल्यामुळे तिच्यासोबत असणं जास्त महत्त्वाचं होतं. मुंबईत चित्रीकरण असेल तरच मी करत होते. पण आता ती मोठी झाली आहे. ‘तू बाहेर जाऊनही शूटिंग करू शकतेस’ असं तिनं मला सांगितलं आहे. मुलांकडून असा पाठिंबा मिळाल्यावर मनावर कोणतंही दडपण नसतं. त्यामुळे आता एखादी चांगली भूमिका, बजेट आणि वेळेवर पॅकअप या गोष्टी मिळाल्या तर नक्कीच चित्रपट करायला आवडेल.

० नाटकात काम करायचा काही विचार ?– सध्या मालिकेवरच लक्ष केंद्रित केलंय. नाटकाचा सध्या काही विचार तरी नाही. एका वेब सीरिजची ऑफर आली आहे पण त्याबद्दल आता सविस्तर काहीच सांगू शकणार नाही.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here