मुंबई : भांडवली बाजारात पडझड सुरु असतानाच कमॉडिटी बाजारात देखील सोने चांदीचा दरात घसरण झाली आहे. आज शुक्रवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोने २०० रुपयांनी स्वस्त झाले असून सोन्याचा भाव ४६ हजारांखाली घसरला आहे.

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या किमतीत २८० रुपयांची घसरण झाली . सोन्याचा भाव ४५९२० रुपयांपर्यंत खाली आला. गेल्या आठ महिन्यातील सोन्याचा हा कमी दर आहे. चांदीमध्ये देखील विक्रीचा सपाटा सुरु आहे. सध्या चांदीच्या किमतीत ८९९ रुपयांची घसरण झाली असून एक किलोचा भाव ६८३७७ रुपये झाला आहे. चांदीने ६६५०५ रुपयांचा स्तर गाठला होता.

good returns या वेबसाईटनुसार आज शुक्रवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५७४० रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४६७४० रुपये आहे. पुण्यात आज सोन्याचा भाव २२ कॅरेटसाठी ४५७४० रुपये आणि २४ कॅरेटसाठी ४६७४० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५५४० रुपये आहे. तर २४ कॅरेटसाठी तो ४९६८० रुपये झाला आहे. चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४३६४० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ४७६०० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५९४० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८६४० रुपये आहे.

कमॉडिटी बाजारातील सोन्याचा भाव हा अजूनही सार्वकालीन उच्चांकी पातळीच्या तुलनेत जवळपास १०००० रुपयांनी स्वस्त आहे. ऑगस्ट २०२० मध्ये एमसीएक्सवर सोन्याचा भाव ५६२०० रुपयांवर गेला होता. मात्र करोना लसीच्या यशस्वी संशोधनानंतर सोन्याची चमक फिकी पडली. लसीकरण मोहीमेने अर्थव्यवस्था झपाट्याने सावरत असल्याने गुंतवणूकदारांनी सोन्यातील गुंतवणूक काढून घेतली आहे.

अमेरिकन सरकारी रोख्यांमधील परतावा वाढल्याने (यूएस ट्रेझरी यिल्ड) सलग दुसऱ्या आठवड्यात सोन्याचा भाव घसरला आहे. स्पॉट गोल्डचा भाव प्रती औंस १७७०.१५ डॉलर आहे. त्यात आठवडाभरात ०.६ टक्के घसरण झाली आहे.

अमेरिकन बाजारात गुरुवारी सोन्याचा भाव १.९ टक्क्यांनी घसरला. अमेरिकेत महागाईचा पारा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे रोख्यांवरील परतावा वाढला. तसेच डॉलरचे मूल्य वधारले. ज्यामुळे सोन्यावरील दबाव वाढल्याचे बोलले जाते. अमेरिकेत आर्थिक सुधारणा होत असली तेथील महागाईने गुंतवणूकदारांची चिंता वाढवली असल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हीसेसचे कमॉडिटी तज्ज्ञ हरीश व्ही. यांनी सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here