म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद: खराब ई-तिकीट वेडींग मशीनमुळे माझ्या प्रामाणिक नोकरीवर अप्रामणिकतेचा ठपका लागणार आहे. खराब ई-तिकीट मशीनमुळे झालेल्या तांत्रिक चुकांचा दोष हे माझ्यावर टाकला जाणार आहे. माझ्या आत्महत्येला कुटुंबाचे कोणीही दोषी नाही. खराब ई-तिकीट मशीन देणारे एसटी प्रशासन दोषी असल्याचे चार पानी पत्र लिहून एका कंडक्टरने एसटी बसमध्येच आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. एस. एस. जानकर असे आत्महत्या करणाऱ्या कंडक्टरचे नाव आहे. जिल्ह्यातील माहुर आगारातील एका बसमध्ये त्यांनी आत्महत्या केली.

माहुर आगारात असलेल्या बसची स्वच्छता करण्यासाठी २६ फेब्रुवारी रोजी सकाळी आगारात आलेल्या सफाई कर्मचाऱ्याने जानकर यांनी बसच्या लोखंडी रेलिंगला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे पाहिले. त्यांनी ही माहिती आगारातील अन्य कर्मचाऱ्यांना तसेच अधिकाऱ्यांना दिली. या प्रकरणी माहुर पोलिसांना घटनास्थळी बोलावण्यात आले. कंडक्टर जानकर यांना तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. या ठिकाणी जानकर यांना तपासून मृत घोषित करण्यात आले. घटनास्थळाहून एका वहीमध्ये आत्महत्येपूर्वी चार पानी मृत्यूपूर्वीचा जबाब लिहिलेला पोलिसांना आढळून आला.

माहुर बस स्थानकाचे आगार प्रमुख व्ही.टी. धुतमल यांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ फेब्रुवारीला पहाटे चार वाजताच्या दरम्यान एस. एस. जानकर यांनी आगारातील एका बसमध्ये गळफास लावून घेतला होता. त्यांच्या जवळील वहीत चार पानांची सुसाईड नोट सापडली आहे. या प्रकरणी माहुर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. एस. एस. जानकर यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. जानकर हे नांदेड शहरात सिडको भागात राहात होते, अशी माहिती धुतमल यांनी दिली.

‘मला दोषी ठरवतील..’

संजय संभाजी जानकर (एस. एस. जानकर) यांनी चार पानी लिहिलेल्या चिठ्ठीत २४ फेब्रुवारी रोजी माहुर ते महागाव या रूटवर प्रवासी घेऊन जात असताना, तिकीट तपासणी पथकाने धनोडा गावाजवळ बस तपासून तिकीट अपहाराचा आरोप लावला. या आरोपावर जानकर यांनी ‘चार पानी जबाब’ असा उल्लेख असलेली सुसाइड नोट लिहून आत्महत्या केली. आपण प्रामाणिकपणे कर्तव्य बजावले आहे. तिकीट मशीन नादुरूस्त असल्याने ३ फुल एक हाफ असे लिहून दिले. सदर मशीन खराब होण्याची प्रिंट न येण्याची तक्रार वारंवार कंडक्टर करत असतात. मी कितीही सांगितले तरी मलाच दोषी ठरवण्यात येणार आहे. मात्र तांत्रिक दोष असलेल्या एसटी प्रशासनाला आपल्या आत्महत्येप्रकरणी दोषी ठरवावे असे त्यांनी जबाबात लिहून ठेवले आहे.

चार वर्षांपूर्वीच कर्तव्यावर रूजू

एस.एस. जानकर यांच्यावर यापूर्वी अपहाराचे आरोप लावण्यात आले होते. अंदाजे १० वर्षे ते निलंबित होते. तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी राबवलेल्या कुटुंब कल्याण योजनेतून जानकर पुन्हा एसटीच्या सेवेत आले होते. बस तपासणी करताना, तिकीट अपहारप्रकरणी त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता होती, अशीही माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली.

ईटीआय मशीनचा गोंधळ

एसटीमध्ये ईटीआय मशीनद्वारे तिकीट देण्यात येत असते. अनेक वेळा या मशीनबाबत संबंधित वाहकांकडून तक्रारी करण्यात येत असतात. कधी कधी प्रिंट न निघणे, हँग होणे यासह अन्य तक्रारीही समोर आलेल्या आहेत. याबाबत महामंडळाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. यामुळे अनेक वाहकांवर तिकीट अपहाराचे गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here