म. टा. प्रतिनिधी, नगर: करोना रुग्णांचे आकडे वाढत असताना दंड करून आणि अनेकदा सांगूनही नागरिक दक्षता घेत नाहीत. त्यामुळे नगरच्या महापालिकेने वेगळीच शक्कल लढविली. कारवाई पथकासोबत बँड पथक पाठवून मास्क न वापरणाऱ्यांना गुलाबपुष्प आणि मास्क देऊन गांधीगिरी केली. दंडाऐवजी मनापकडून बँडबाजा वाजवून झालेला हा सत्कार घेताना विनामास्क फिरणारे नागरिक खजिल होत असल्याचे दिसून आले.

नगर शहरातही गेल्या काही दिवसांत करोनाचे नवे रुग्ण वाढत आहेत. लॉकडाऊनला होणारा विरोध लक्षात घेता अन्य उपाययोजना करण्यावर भर देण्यात येत आहे. मात्र, अनेक नागरिक पुरेशी दक्षता घेताना दिसत नाहीत. विनामास्क बाजारपेठेत फिरणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने शुक्रवारी वेगळीच शक्कल लढविली. मनपातर्फे यापूर्वीच दक्षता पथके स्थापन करण्यात आली आहेत. त्यातील कापडबाजार भागातील पथक आज कारवाईसाठी जाताना सोबत एक बँडपथक घेऊन गेले.

दंड न करता गांधीगिरी पद्धतीची कारवाई करण्याचे त्यांनी ठरविले. विना मास्क फिरणाऱ्यांना थांबवून त्यांना गुलाबाचे फूल देण्यात आले. त्यांच्या तोंडावर मास्क लावण्यात येत होता. अधिकारी कर्मचाऱ्यांसोबतच या भागातील माजी नगरसेवक संजय चोपडा हेही कारवाईत सहभागी झाले. बँडच्या तालावर सुरू असलेली ही मोहीम लक्षवेधक ठरली. रिक्षाचालक, पायी फिरणारे, दुचाकीस्वार यांना थांबवून मास्क दिले जात होते. त्यांना नियमित मास्क वापरण्याची सूचना देण्यात येत होती. हा अनोख सत्कार स्वीकारताना अनेक जण खजिल होत असल्याचे दिसून आले, तर काहींना हसत हसत स्वीकार केला.

यासंबंधी बोलताना मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे म्हणाले की, ‘गेल्या आठ ते दहा दिवसांपासून नगर शहरात नव्या रुग्णांची संख्या वाढत आहे. हा धोका आपण वेळीच ओळखला पाहिजे. त्यासाठी नागरिकांना सहकार्य करण्याचे आम्ही आवाहन केले. तरीही अनेक नागरिक विनामास्क फिरत असल्याचे आढळून आले. आमची पथके अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करीत आहेतच. त्यासोबत नागरिकांचे वेगळ्या पद्धतीने प्रबोधन करता यावे, यासाठी ही गांधीगिरी पद्धतीची कारवाई करण्यात आली. आता तरी नागरिकांनी बोध घ्यावा. नागरिकांच्या सुरक्षेसाठीच आम्ही ही मोहीम राबवित आहोत. त्यामुळे नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावे, अशी अपेक्षा आहे.’

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here