रामेश्वर जगदा‌ळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

राज्यातील महविकास आघाडीकडून सरकारकडून मुंबईत ”ची घोषणा करण्यात आली असली तरी ती केवळ बीकेसी, नरिमन पॉइंटसह ठरवून दिलेल्या अनिवासी २२ क्षेत्रांसाठी लागू आहे. मात्र, याबाबत सामान्य नागरिकच नव्हे तर प्रशासनातील काही घटकही अनभिज्ञ असल्याचे वास्तव समोर आले आहे. ‘मुंबई २४ तास’चा अनुभव घेण्यासाठी सामान्य मुंबईकर शहरातील विविध ठिकाणी रात्री उशिरा गर्दी करत आहेत. मात्र, चौपाट्या, मरिन ड्राइव्ह आदी परिसरात लोकांना पोलिसांकडून हटकले जात असून, आम्हाला नाइट लाइफबाबत काहीच सूचना देण्यात आल्या नसल्याचे पोलिस सांगत आहेत.

तीन पाळ्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या जेवणाची रात्री बारानंतर गैरसोय होते. ती दूर करण्यासाठी आणि रोजगाराला चालना देण्यासाठी नाइट लाइफ हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर काही विभागांमध्ये राबवला जात आहे. या ‘नाइट लाइफ’चा आनंद लुटण्यासाठी शनिवारी रात्री काही मुंबईकर बाहेर पडल्याचे दिसून आले. वीकेण्ड असल्याने नेहमीप्रमाणे शनिवारी मरिन ड्राइव्ह व गिरगाव चौपाटी परिसरात गर्दी पाहायला मिळाली. मात्र, रात्री दोन वाजल्यानंतर परिसर रिकामी करण्याच्या सूचना लोकांना दिल्या जात होत्या. फूड ट्रक व खाण्याच्या इतर गोष्टी पुरवणारी छोटी दुकाने बंद असल्याने अनेकांची निराशा झाली. या संकल्पनेचा ज्यांच्या खांद्यावर अधिक भार आहे, अशा पोलिसांनाही याबाबत कोणत्याही सूचना नसल्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात होते. दरम्यान, ‘आम्ही आमच्या जबाबदारीवर हा व्यवसाय करत आहोत. लोकांचा प्रतिसाद समाधानकारक आहे, मात्र सुविधा देण्यासाठी अनेक गोष्टीची गरज आहे. मुंबई पालिका तसेच पोलिस प्रशासनाचे परवाने आम्हाला अजून मिळालेले नाहीत. व्यवसायासाठी लागणाऱ्या परवानग्या कशा मिळवायच्या या बाबतीत फूड ट्रक व्यावसायिकांमध्ये संभ्रम आहे’, अशी प्रतिक्रिया एका फूड ट्रकचा मालक अभिषेक कोकीळ याने ‘मटा’ला दिली.

रात्रभर खुले राहणारे परिसर: नरिमन पॉइंट, मरिन ड्राइव्ह, काळा घोडा, लोअर परळ, बीकेसी

फूड ट्रकची ठिकाणे (अंतिम निर्णयानंतर): दादर, सीएसटी, कुर्ला, चर्चगेट, मुंबई सेंट्रल, वांद्रे

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here