डीजीसीएच्या आदेशानुसार आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी विमानांवरील बंदी ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही बंदी मालवाहतूक विमानं आणि डीजीसीएने परवानागी दिलेल्या विमानांना लागू नसेल.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २७ जानेवारीला मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. या मार्गदर्शक सूचना आणि एसओपी ३१ मार्चपर्यंत लागू राहतील, असा आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने शुक्रवारी दिला. यासोबतच डीजीसीएनेही पत्रक जारी करत आंतरराष्ट्रीय विमानांवरील बंदी ३१ मार्चपर्यंत वाढवली आहे.
२६ जून २०२० ला जारी केलेल्या आदेशात काहीशी सुधारणा करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांवर (भारतातून जाणाऱ्या आणि भारतात येणाऱ्या) बंदी राहणार आहे. ही बंदी ३१ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत वाढवण्यात आली आहे, असं डीजीसीएनं आपल्या पत्रकात म्हटलं आहे. पण काही ठराविक मार्गांवरील आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणं सुरू राहतील, असं डीजीसीएनं स्पष्ट केलं आहे.
करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउन जाहीर करत सरकारने आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर गेल्या वर्षी २३ मार्चमध्ये बंदी घातली होती. यानंतर सरकारने इतर देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशात आणण्यासाठी मे २०२० मध्ये ‘वंदे भारत मिशन’ राबवलं होतं.
करोनाचा प्रादुर्भाव काहीसा आटोक्यात आल्यानंतर सरकारने काही आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरू केली. अनेक देशांसोबत केलेल्या एअर बबल करारानुसार आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरू करण्यात आली. पण अतिशय मोजक्याच उड्डाणांना डीजीसीएने ही परवानगी दिली आहे.
अमेरिका, ब्रिटन, युएई, केनिया, भूतान आणि फ्रान्ससह एकूण २४ देशांसोबत भारताने ‘एअर बबल’ करार केला आहे. ‘एअर बबल करारा’नुसार संबंधित दोन्ही देशांमध्ये विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणं करता येऊ शकतात. ‘एअर बबल’द्वारे येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. ब्रिटन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेत करोनाचे नवीन आणि अतिशय संसर्गजन्य प्रकार आढळून आल्याने सरकारने या सूचना (SOP) जारी केल्या आहेत. २२ फेब्रुवारीपासून त्या लागू झाल्या असून पुढील आदेशापर्यंत कायम राहणार आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times