पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ( ) यांनी गुरुवारी इंधन दरवाढीचा अनोख्या पद्धतीने निषेध केला. त्या सचिवालयात ई-स्कूटरवर गेल्या. ममता बॅनर्जी या स्कूटरवर मागे बसल्या होत्या. तर मंत्री स्कूटर चालत होते. ममतादीदींच्या या अनोख्या आंदोलनाची जोरदार चर्चा झाली. आता भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणीही स्कूटर चालवताना दिसून आल्या आहेत.
केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी शुक्रवारी पश्चिम बंगालमधील पंचपोटा येथे रोड शो केला. या रोड शोमध्ये भाजप कार्यकर्त्यांसोबत त्या स्कूटर चालवताना दिसून आल्या. त्याआधी त्यांनी २४ परगनामध्येही रोड शो केला होता.
स्मृती इराणी यांनी पंचपोटामध्ये घेतलेल्या सभेत ममता बॅनर्जींवर हल्लाबोल केला. पश्चिम बंगालमधील नागरिक भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या सभा आणि इतर कार्यक्रमांमध्ये मोठ्यासंख्यने सहभागी होत आहेत. याबद्दल त्यांचे आभार. पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच कमळ फुलेल असे संकेत यातून मिळत आहेत, असं स्मृती इराणी म्हणाल्या.
ममता बॅनर्जींच्या सत्तेत हिंसा केली जात आहे. तृणमूल काँग्रेस यंदाच्या निवडणुकीत पराभूत होईल, हे जनतेच्या मतदानातून स्पष्ट होईल, असं स्मृती इराणी म्हणाल्या.
पश्चिम बंगालमध्ये एप्रिल- मे महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने शुक्रवारी ४ राज्ये आणि १ एका केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकांची घोषणा केली. यानंतर या राज्यांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या २९४ जागा आहेत. राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला या निवडणुकीत घेरण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times