म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

गेल्या वर्षीच्या विकासनिधीचा शिवसेनेकडून गैरवापर झाल्याचा आरोप भाजपलाच महागात पडला आहे. यंदाच्या वाटपात , काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष या महाविकास आघाडीतील पक्षांनी एकत्र येऊन भाजपला धक्का दिला आहे. ६५० कोटींपैकी भाजपची फक्त ६० कोटींच्या निधीत बोळवण केली असून आघाडीतील पक्षांनी स्वतःसाठी ३०० कोटींहून अधिक घसघशीत निधी खेचून घेतला आहे.

नगरसेवकांना आपल्या विभागात विकासकामे करण्यासाठी स्थायी समितीत अर्थसंकल्प मंजूर करण्यापूर्वी पालिका आयुक्तांकडून विकासनिधी जाहीर करण्यात येतो. यावेळी शिवसेनेसह सर्वपक्षीय नेत्यांच्या झालेल्या बैठकीत पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी ९७५ कोटी रुपये विकासनिधी देण्याचे मान्य केले होते. त्यामुळे यंदा राजकीय पक्षांना विकासकामांसाठी मुबलक निधी उपलब्ध होणार होता. याच दरम्यान पालिकेतील भाजप पक्षनेते विनोद मिश्रा यांनी गेल्या वर्षी विकासनिधीच्या वाटपात स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या विभागात सर्वाधिक निधी वाटप झाल्याचा मुद्दा उपस्थित करत शिवसेनेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. याची दखल घेऊन पालिका आयुक्तांनी यंदाच्या विकासनिधीत तब्बल ३२५ कोटींची कपात केली. त्यामुळे स्थायी समितीला ६५० कोटींचा निधी मिळाला.

आयुक्तांनी भाजपच्या तक्रारीनंतर निधीत कपात केल्याने सेनेच्या वर्तुळात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. याचा बदला भाजपचा निधी कमी करून सेनेने घेतला आहे. भाजपचे पालिकेत ८३ नगरसेवक असून कमी निधीमुळे प्रत्येकाला ७० लाखांचा निधी मिळणार आहे. तर, शिवसेनेने महाविकास आघाडीचा धर्म पाळत काँग्रेस, राष्ट्रवादी व समाजवादी पक्षाला मोठा निधी दिला आहे. तीनही पक्षाच्या नगरसेवकांच्या पदरात दीड कोटीहून अधिक निधी पडणार आहे.

या निधीवाटपाबाबत भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी भाजपचे ८३ नगरसेवक असतानाही त्यांच्या विभागातील कामांसाठी सेनेने अत्यंत कमी निधी देऊन पालिकेत कोणत्या प्रकारचे राजकारण चालते हे दाखवून दिले आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. विरोधी पक्ष म्हणून दावा करणारी काँग्रेस सेनेच्या मांडीला मांडी लावून अधिक निधी घेते, यावरून खरा विरोधी पक्ष भाजपच आहे हे स्पष्ट झाले आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

‘कुणावरही सूड उगवलेला नाही’

विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी काँग्रेसचे झोपडपट्टी भागातील अधिक नगरसेवक असून तेथे काम करण्यासाठी आम्ही मोठ्या निधीची मागणी केली होती. ती पूर्ण झाली आहे. यात महाविकास आघाडीचा काही संबंध नाही, असा दावा राजा यांनी केला. स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आपण कुणावरही सूड उगवलेला नाही. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही निधीवाटप केले आहे. सर्व पक्षांना अधिकाधिक निधी देण्याचा प्रयत्न केला आहे, असे जाधव म्हणाले.

राजकीय बलाबल

शिवसेना ९७

भाजप ८३

काँग्रेस २९

राष्ट्रवादी ८

सप ६

एमआयएम २

मनसे १

एक जागा रिक्त

एकूण २२७

विकासनिधी वाटप

२२७ नगरसेवकांना प्रत्येकी एक कोटी : २२७ कोटी

शिवसेना २३३ कोटी

काँग्रेस ९० कोटी

भाजप ६० कोटी

राष्ट्रवादी २१ कोटी

समाजवादी पक्ष १८ कोटी

एकूण ६५० कोटी

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here