मुलाच्या सर्वांगीण विकासात खेळण्यांचे महत्त्व लक्षात घेऊन पंतप्रधानांनी यापूर्वीही देशात खेळण्यांचे उत्पादन वाढविण्यावर जोर दिला आहे. यासंदर्भातील पंतप्रधानांच्या विचारांवर आधारित इंडिया टॉय फेअर २०२१ चे आयोजन केले जात आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी ११ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘इंडिया टॉय फेअर २०२१ ‘ चे उदघाटन करण्यात आले. यावेळी पंतप्रधानांनी खेळणी उत्पादकांशी संवाद साधला. खेळणी उद्योगातील समस्यांचा आढावा घेतला.
हा मेळावा २७ फेब्रुवारी ते २ मार्च २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी शाश्वत दुवे तयार व्हावेत आणि संवादाला चालना मिळावी यासाठी खरेदीदार, विक्रेते, विद्यार्थी, शिक्षक, डिझाइनर आदींसह सर्व संबंधितांना एकत्रित आणण्याचे उद्दिष्ट या आयोजनामागे आहे.
या क्षेत्रातील गुंतवणूक आकर्षित करणे आणि निर्यातीला चालना याद्वारे, आगामी काळात खेळण्यांचे उत्पादन व सोर्सिंग याचे जागतिक केंद्र म्हणून भारताला कसे पुढे आणता येईल, याबाबत चर्चा करण्यासाठी या व्यासपीठाच्या माध्यमातून सरकार आणि उद्योग एकत्रित येऊ शकतील. ई-कॉमर्स सक्षम व्हर्च्युअल प्रदर्शनात ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील १००० हून अधिक प्रदर्शक त्यांची उत्पादने प्रदर्शित करतील. यात पारंपरिक भारतीय खेळणी तसेच इलेक्ट्रॉनिक खेळणी, आलिशान खेळणी, कोडी आणि खेळ यासह आधुनिक खेळण्यांचे दर्शन घडेल.
खेळण्यांचे आरेखन व उत्पादनात क्षमता सिद्ध केलेल्या प्रख्यात भारतीय व आंतरराष्ट्रीय व्यक्तींचे असंख्य वेबिनार आणि पॅनेल चर्चादेखील आयोजित करण्यात येणार आहेत. या मेळाव्यात पारंपरिक खेळणी तयार करण्याच्या शिल्प प्रात्यक्षिकासह अनेक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मुलांना मिळणार आहे. तसेच खेळण्यांची संग्रहालये आणि कारखान्यांना व्हर्च्युअल माध्यमातून भेट देता येणार आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times