करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कडक निर्बंधांची टांगती तलवार, करोना नियमांची होणारी पायमल्ली, वैधानिक विकास मंडळांना मुदतवाढ, मराठा आरक्षणाचा गुंता सोडविण्यासाठी होणारा विलंब, शिक्षकांचे सुरू असलेले आंदोलन, शिक्षण खात्यातील गोंधळ, सरकार आणि राज्यपाल यांच्यातील वाढता विसंवाद, सेलिब्रेटींच्या ट्वीटची चौकशी आदी असंख्य मुद्द्यांवरून सोमवारपासून सुरू होणारे विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन तापणार आहे. करोनाचे संकट कायम असल्याने अलीकडच्या काळात प्रथमच अर्थसंकल्पीय अधिवेशन जेमतेम आठ दिवस चालणार आहे.
पुण्यातील पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात संजय राठोड यांचे नाव घेतले जात असल्याने भाजप त्यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाला आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून हा मुद्दा लावून धरण्याचे भाजपने ठरवले आहे. या प्रकरणात समोर येत असलेली माहिती आणि करोनाचे निर्बंध झुगारून पोहरादेवी येथे केलेले शक्तिप्रदर्शन यामुळे राठोड यांच्याबद्दल काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्येही नाराजी आहे. एकूणच राठोड प्रकरणात एकट्या शिवसेनेला भाजपशी दोन हात करावे लागणार असल्याचे दिसते.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आघाडी सरकारच्या विरोधात भाजपने आक्रमक सूर लावला असून पक्षनेते वेगवेगळ्या मुद्द्यांवर सरकारवर सातत्याने टीका करताना दिसत आहेत. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीतूनही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभात्याग केला होता. त्यामुळे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्षाकडून बहिष्कार टाकण्याचे जवळपास निश्चित असल्याचे समजते.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times