नवी दिल्ली:
सीएएविरोधात सीलमपूर, जामिया, शाहीन बागमध्ये आंदोलन सुरू आहे. ही आंदोलने योगायोग नाही, तो एक प्रयोग आहे. यामागे राजकारणाचं असं डिझाइन आहे, जे राष्ट्राच्या सौहार्दाला बाधा आणत आहे. कायद्याला केवळ विरोध असता तर सरकारच्या आश्वासनांनंतर तो संपला असता. पण आप आणि काँग्रेसची ही खेळी आहे. हे लोक देशाचे तुकडे तुकडे करण्याचा विचार असणाऱ्या लोकांना वाचवत आहे, अशा शब्दात मोदींनी आप आणि काँग्रेसवर टीका केली. दिल्लीत कडकडडुमा येथे पंतप्रधान मोदींची प्रचारसभा झाली. त्यात ते बोलत होते.

दिल्ली बदलायची असेल, तर आप सरकार बदला: मोदी

दिल्लीचं सरकार गरीब, बेघरांना घर देण्यास इच्छुक नाही. दिल्लीत पंतप्रधान आवास योजना लागू होत नाही. जोपर्यंत दिल्लीत असं सरकार असणार, तोपर्यंत दिल्लीत लोकांच्या भलाईचं काम ते अडवणार. दिल्ली बदलायची असेल तर दिल्लीचं सरकार बदला, असं आवाहन मोदी यांनी केलं. ते म्हणाले, ‘भारतीय जनता पार्टी जे बोलते ते करते. भाजप नकारात्मकतेत नव्हे तर सकारात्मकतेवर विश्वास ठेवते. देशासाठी केलेले संकल्प आमच्यासाठी मोठे आहेत. देशासमोर जी शेकडो आव्हाने होती, ती सोडवतोय. दिल्लीतही मोठी समस्या होती. अवैध कॉलनींचा प्रश्न कोणीही सोडवला नव्हता. कोर्टात तारखांवर तारखा पडत होत्या. दिल्लीच्या ४० लाखांहून अधिक लोकांना मोठ्या चिंतेतून आमच्या सरकारने मुक्त केलं आहे. तुम्हाला आता सरकारी बुलडोझरच्या चिंतेतून मुक्ती मिळाली आहे.’

‘११ फेब्रुवारीनंतर दिल्लीत जेव्हा भाजपचं सरकार बनेल तेव्हा या सर्व कॉलनींमध्ये विकासकामे आणखी वेगाने पुढे सरकणार आहेत. दिल्ली भाजपने हाही संकल्प केला आहे की या कॉलनींसाठी डेव्हलपमेंट फंड बनवला जाईल. झोपडीधारकांना पक्की घरं मिळतील,’ असं आश्वासन मोदी यांनी दिलं.

दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्यात भाजप एकेक करत आपलं ट्रम्प कार्ड बाहेर काढत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा सुरुवातीपासूनच दिल्ली निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यानंतर योगी आदित्यनाथ यांनीही येथे सभा घेतली. आता पंतप्रधान स्वत: मैदानात उतरले आहेत.

राष्ट्रवाद जिंकणार, शाहीन बाग हरणार

मोदींच्या रॅलीच्या आधी कडकडडुमा येथे लोकांनी ‘राष्ट्रवाद जिंकणार, शाहीन बाग हरणार’ अशा घोषणा दिल्या. भाजप नेते विजय गोयल यांनी या घोषणा लोकांकडून वदवून घेतल्या.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here