महिलेने मृत्यूपूर्वी दिलेल्या जबाबात बाप आणि भावासह इतर १० जणांवर आरोप केला आहे. त्यांनी पेट्रोल ओतून जिवंत पेटवून दिल्याचे तिने २५ फेब्रुवारीला दिलेल्या जबाबात सांगितले होते. महिलेने दुसरे लग्न केल्याने कुटुंबीय नाराज होते. २५ तारखेला महिलेला ९० टक्के होरपळलेल्या अवस्थेत सरदारशहर येथील रुग्णालयात आणण्यात आले होते. प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला बीकानेर येथील रुग्णालयात आणले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सरदारशहर येथील वॉर्ड क्रमांक ३ मधील रहिवासी कौशल्या हिचे लग्न २०१४ साली नाकरासर येथे झाले होते. तिला एक चार वर्षांची मुलगी आहे. नुवा येथील राहणाऱ्या चेतन प्रजापत याच्यासोबत तिची ओळख झाली. प्रेमसंबंध जुळल्यानंतर आठवडाभरापूर्वी त्यांनी कोर्टात लग्न केले. तिच्या कुटुंबीयांना याची माहिती मिळाल्यानंतर ते संतापले होते. विवाहिता बुधवारी आपल्या माहेरी आली होती. त्यावेळी तिने लग्नाबाबत त्यांना सांगितले. हे नाते तोडून टाकण्यासाठी त्यांनी तिच्यावर दबाव टाकला.
पोलीस सूत्रांनुसार, गुरुवारी २५ फेब्रुवारीला रात्री विवाहितेला होरपळलेल्या अवस्थेत सरदारशहर येथील स्थानिक रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी तिने पोलिसांकडे जबाब नोंदवला होता. वडील शीशपाल आणि भाऊ सुभाष, नरेश, मामा दर्शन, नत्थू, कालू यांच्यासह दहा जणांवर तिने आरोप केला होता. त्यांनी पेट्रोल ओतून पेटवून दिले असे तिने म्हटले होते. या प्रकरणाची चौकशी करून आरोपींवर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times