दुबई : भारताचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्माने तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये दमदार खेळी साकारली होती. या गोष्टीचा चांगलाच फायदा रोहितला आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी रोहितने क्रमवारीत मानाचे स्थान पटकावल्याचेही पाहायला मिळत आहे.

रोहितने आयसीसीच्या क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल १० फलंदाजांमध्ये स्थान पटकावले आहे. त्याचबरोबर आतापर्यंतच्या कारकिर्दीमधील त्याने पटकावलेले हे सर्वोत्तम स्थान ठरले आहे. रोहितने तिसऱ्या दिवस-रात्र कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ९६ चेंडूंत ६६ धावांची खेळी साकारली होती. या सामन्यातील ही सर्वोत्तम खेळी ठरली होती. त्याचबरोबर रोहितने दुसऱ्या डावात नाबाद २५ धावांची खेळी साकारत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते. त्यामुळेच रोहितने कसोटी क्रमवारीत सहा स्थानांची झेप घेतल्याचे पाहायला मिळाले आहे.

रोहित तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी आयसीसीच्या फलंदाजांच्या क्रमवारीत १४व्या स्थानावर होता. पण या कसोटी सामन्यानंतर रोहितने आठवले स्थान पटकावले आहे. रोहितने यावेळी दुसऱ्यांदा अव्वल १० फलंदाजांमध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी रोहितने ७४२ गुणांनुसार अव्वल १० फलंदाजांमध्ये प्रवेश केला होता. पण त्यावेळी रोहितने १०वे स्थान पटकावले होते. पण आता मात्र रोहितने आठवे स्थान पटकावले आहे आणि त्याच्या कारिकिर्दीतील हे सर्वोत्तम स्थान ठरले आहे.

आयसीसीच्या फलंदाजांचांच्या क्रमवारीत रोहितबरोबर अन्य दोन फलंदाज अव्वल १० जणांमध्ये सामील आहेत. भारताचा कर्णधार विराट कोहली यावेळी पाचव्या स्थानावर आहे. भारताचा तंत्रशुद्ध फलंदाज चेतेश्वर पुजारा क्रमवारीत १०व्या स्थानावर आहे. पुजारा या क्रमवारीपूर्वी आठव्या स्थानावर होता. पण पहिल्या डावात पुजारा शुन्यावर बाद झाला आणि त्याचा फटका त्याला या क्रमवारीत बसल्याचे पाहायला मिळत आहे. आयसीसीच्या या फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन आहे, त्याचबरोबर दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज स्टीव्हन स्मिथ आहे. त्यामुळे रोहित आणि विराट यांची इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात कशी फलंदाजी होते आणि त्याचे कसोटी क्रमवारीत नेमके काय होते, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here