नवी दिल्ली: भारतीय संघाचा उपकर्णधार व सलामीवीर रोहित शर्माने दुखापतीमुळे न्यूझीलंड दौऱ्यातून माघार घेतल्याने उर्वरित दौऱ्यात रोहितची जागा कोण घेणार, हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आज सायंकाळी माध्यमांशी बोलताना याबाबतचा सस्पेन्स समाप्त केला आहे. रोहितच्या जागी एका युवा व गुणी फलंदाजाला संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत रोहित शर्माच्या जागी शुभमन गिलला संधी देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या माहितीला खुद्द सौरव गांगुली यांनी दुजोरा दिला. वनडेत रोहितच्या जागी कोण खेळणार हे मात्र स्पष्ट करण्यात आलेले नाही. रोहितच्या जागी कसोटीत शुभमन गिलला संधी मिळेल, अशी चर्चा आधीपासूनच होती. त्याला कारणही तसेच होते. त्याने न्यूझीलंडमध्येच केलेल्या जबरदस्त खेळीमुळे त्याला भारतीय संघात स्थान मिळेल असे बोलले जात होते.

शुभमन सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. न्यूझीलंड अ संघाविरुद्ध भारत अ संघाकडून खेळताना शुभमनने डबल धमाका केला. ख्राइस्टचर्च येथे गेल्या आठवड्यात झालेल्या चारदिवसीय सामन्यात शुभमनने पहिल्या डावात ८३ तर दुसऱ्या डावात नाबाद २०४ धावांची खेळी केली होती. या खेळीत ४ षटकार आणि २२ चौकारांचा समावेश होता. या खेळीच्या जोरावरच शुभमनला भारतीय संघात स्थान मिळाले आहे. शुभमनची याआधीही कसोटी संघात निवड झालेली आहे. मात्र, त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती.

दरम्यान, कसोटीत पृथ्वी शॉ व शुभमन गिल भारतीय डावाची सुरुवात करण्याची शक्यता आहे.

रोहितच्या पायाला दुखापत

न्यूझीलंडविरुद्ध माउंट माउंगनुई येथील बे ओव्हल मैदानावर झालेल्या पाचव्या टी-२० सामन्यात रोहित शर्माच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला फलंदाजी करताना मैदान सोडावे लागले होते. त्यानंतर तो क्षेत्ररक्षणासाठी देखील आला नाही. त्याच्या ऐवजी केएल राहुलने कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडली होती. रोहितला दुखापतीतून सावरण्यासाठी बराच वेळ लागणार असून त्यामुळेच तो उर्वरित न्यूझीलंड दौऱ्यालाही मुकणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here