अहमदनगर: करोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतरही एकाच पोलिस ठाण्यातील सहा पोलिसांना करोनाची बाधा झाली आहे. यामध्ये एका पोलिस अधिकाऱ्याचा आणि महिला कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. तालुक्यातील पोलिस ठाण्यातील हे पोलिस सध्या घरीच विलगीकरणात आहेत. जिल्ह्यातील सर्व पोलिसांचे अद्याप लसीकरण झालेले नाही. काहींनी अलीकडेच लस घेतली आहे. तरीही आता करोनाचे रुग्ण वाढू लागल्याने प्रतिबंधकात्मक उपाययोजनांसाठी पोलिसांना पुन्हा रस्त्यावर बंदोबस्तासाठी यावे लागत आहे.

वाचा:

बेलवंडी पोलिस ठाण्यातील पोलिसांचे आठ दिवसांपूर्वीच लसीकरण करण्यात आले होते. त्यातील काहींना त्रास होऊ लागल्याने तपासणी करण्यात आली. तेव्हा आठ जणांना करोनाची लागण झाल्याचे आढळून आले. त्यांना घरीच विलगीकरणात ठेवून उपचार करण्यात येत आहेत. यासंबंधी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी सांगितले की, ‘लस घेतल्यानंतर तिचा परिणाम लगेच होत नाही. त्यासाठी १५ ते २० दिवसांचा कालावधी जावा लागतो. या पोलिसांना पहिल्याच आठवड्यात करोनाची लागण झाली आहे. लस घेतली तरी तिचा परिणाम सुरू होऊपर्यंत काळजी घेणे आवश्यक असते.’

सध्या जिल्ह्यात पुन्हा करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने उपाययोजना लागू केल्या आहेत. त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांना पुन्हा रस्त्यावर उतरून काम करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांचा लोकांशी आणि बाधित रुग्णांशीही संपर्क वाढत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांपासून लस देण्यास सुरवात झाली. त्यानंतर पोलिसांनाही ती देण्यात आली. मात्र, अद्याप सर्व पोलिसांनी लस घेतलेली नाही. ज्यांनी घेतली, त्यांनाही लसीचा परिणाम होण्यास अद्याप अवकाश आहे, अशा स्थितीत पोलिसांना पुन्हा रस्त्यावर उतरून काम करण्याची वेळ आली आहे.

एकाच पोलिस ठाण्यातील सहा जणांना बाधा झाल्याचे पुढे आल्याने पोलिसांना दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बेलवंडीचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे म्हणाले की ‘आम्ही सर्व पोलिसांना योग्य ती खबरदारी घेऊनच कामावर जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. एकदम सहा पोलिस आजारी पडल्याने आणि सध्या पोलिसांची जास्त गरज असल्याने कामावर परिणाम होणार आहे. मात्र, इतरांना बाधा होऊ नये यासाठी काळजी घेत आहोत.’

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here