मुंबईः ‘औद्योगिक मंदी असतानाही राज्य सरकारने चांगलं काम केले. रोजगार सुलभ व्हावे म्हणून महारोजगार आणि महाजॉब पोर्टल सुरु केलं आहे. राज्य सरकारने आर्थिक अडचण असतानाही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे,’ अशी माहिती भगतसिंह कोश्यारी यांनी केली आहे.

आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून यावेळी अनेक मुद्द्यांवरुन विरोधकांनी राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने झाली. यावेळी राज्यपालांनी राज्य शासनाच्या कामाचा आढावा मांडला.

राज्यपालांनी करोना योध्दांना अभिवादन करत अभिभाषणाला सुरुवात केली. तसंच, ‘धारावीसारख्या दाटीवाटीच्या वस्तीमध्ये राज्य शासनानं प्रभावी काम केलं आहे. करोना संदर्भात मदतीसाठी टास्क फोर्स स्थापन केले. आरोग्य सुविधांमध्ये वाढ केली तसंच, राज्य सरकारने करोना चाचणीसाठी प्रयोगशाळाही वाढवण्यात आल्या आहेत,’ असं म्हणत राज्य सरकारच्या कामाचा आढावा आज सादर केला.

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी हा देशातील अभिनव उपक्रम ठरला आहे. राज्य सरकारची करोना विरुद्धची लढाई सुरु असून सरकारने आता मी जबाबदार ही योजना सुरु केलीये. करोना संदर्भातील आरोग्य उपाययोजना वाढवण्याची गरज आहे. दुसरी लाट येण्याची शक्यता असल्यानं आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे,’ असंही यावेळी राज्यपालांनी सांगितलं.

‘नंदुरबार येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात आले. राज्यात ५०० प्रयोगशाळा सुरु आहेत. करोना प्रादुर्भाव असल्यानं अंगणवाडीत न येऊ शकणाऱ्या बालकांना आणि गर्भवती मातांना घरपोच शिदा पुरवला आहे,’ असंही राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात नमूद केलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here