मुंबई: करोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी राज्याची आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून आवश्यक असलेली सर्व पावले उचलण्यात येत आहेत. त्यामुळे करोनाबाबत कुणीही घाबरून जाण्याचे कारण नाही, असे आवाहन महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. दरम्यान, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासह राज्यात आतापर्यंत ११ हजार ९३ जणांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील १०७ जण चीनमधील करोनाचा सर्वाधिक फैलाव असलेल्या भागातून आलेले आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

करोना व्हायरसग्रस्त चीनमधून परतणाऱ्या प्रवाशांबाबत राज्य सरकारकडून सर्वतोपरी खबरदारी घेण्यात येत आहे. या प्रवाशांची तातडीने तपासणी करून पुढील कार्यवाही केली जात आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात तरी करोनाची लागण झालेला एकही गंभीर रुग्ण आढळलेला नाही, असे टोपे यांनी स्पष्ट केले. चीनमध्ये करोनाचा प्रकोप वाढला असला तरी महाराष्ट्रातील नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. राज्य सरकार कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे, असेही टोपे यांनी नमूद केले.

चीन तसेच चीनच्या शेजारी देशांमधून जे कुणी परतत आहेत त्यांची तपासणी करून सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी असा त्रास असलेल्या प्रवाशांना मुंबई आणि पुण्यातील विविध रुग्णालयांत दाखल करण्यात येत आहे. विविध रुग्णालयांत स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. मुंबई, पुण्यासह नांदेडमधील निवडक रुग्णालयांमध्येही वैद्यकीय पथके नेमण्यात आली आहेत. साथीचा आजार असलेल्या रुग्णांवरील उपचार व अन्य बाबी ही पथके हाताळत आहेत, असे टोपे यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच महाराष्ट्राच्या विविध भागात ३ फेब्रुवारीपर्यंत ११ हजार ९३ जणांची तपासणी करण्यात आली आहे. चीन व शेजारी देशांतून आलेले हे सर्वजण होते. चीनमधील करोना व्हायरसचा वाढता फैलाव लक्षात घेऊन १८ जानेवारीपासून राज्याच्या आरोग्य विभागाने ही तपासणी मोहीम हाती घेतली होती. ती अखंडपणे सुरू आहे, असे आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here