केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुग्राम येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये करोनावरील लस घेतली. त्यांच्या आधी पंतप्रधान मोदींनी आज सकाळीच लसचा पहिला डोस घेतला.
देशात आजपासून करोनावरील लसीकरण मोहीमेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जाणार आहे. तसंच ४५ वर्षांवरील आजारी नागरिकांना लस दिली जाणार आहे. पंतप्रधान मोदींनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी करोना लसच पहिला डोस घेतला. यासह अनेक राज्यांतील नेत्यांनी करोनाची लस घेतली. यात बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा समावेश आहे.
करोनावरील लस घेण्यासाठी कोविन पोर्टलवर दुपारी एक वाजेपर्यंत १० लाखांहून अधिक नागरिकांनी नोंदणी केल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दुपारी १ वाजता दिली.
दरम्यान, देशातील ८ राज्यांमध्ये करोनाचे नवीन रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढली आहे. केरळ, महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, जम्मू आणि काश्मीर आणि मध्य प्रदेशात गेल्या दोन आठवड्यांपासून दररोज नवीन रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times