करोना व्हायरसविरोधातील लसीकरण मोहीमेच्या दुसर्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत ६० वर्षांवरील १,२८,६३० आणि ४५ वर्षांवरील १८,८५० नागरिकांना लसचा पहिला डोस देण्यात आला. पहिल्या दिवशी एकूण २४.५ लाख नागरिकांनी कोविन अॅपवर नोंदणी केली. करोना व्हायरसबद्दल केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी नागरिकांना जागरुक राहण्याचं आवाहन केलं आहे. ‘लस आली म्हणून कोणीही निष्काळजीपणा करू नये. करोना व्हायरसच्या संसर्गाबाबत आपल्याला आणखी काही महिने खबरदारी घ्यावी लागेल जेणेकरुन करोनाच्या प्रादुर्भावाची साखळी तोडता येईल’, असं हर्षवर्धन म्हणाले.
विशेष म्हणजे करोना व्हायरसविरोधातील लढाईत लसीकरण मोहिमेच्या दुसर्या टप्प्याच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोमवारी लसीचा पहिला डोस घेतला. पंतप्रधान मोदी सोमवारी सकाळीच दिल्लीतील एम्समध्ये पोहोचले आणि त्यांना लस दिली. यासह पंतप्रधान मोदींनी देशवासियांनाही लस घेण्याचं आवाहन केलं आहे. ‘मी एम्समध्ये करोना लसीचा पहिला डोस घेतला, आमच्या डॉक्टरांनी आणि शास्त्रज्ञांनी करोनाविरूद्धच्या जागतिक लढाईला बळकट करण्यासाठी मोठं काम केलं ते कौतुकास्पद आहे’, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. ही लस घेण्यास पात्र असलेल्या सर्वांनी भारताला करोनामुक्त करण्यासाठी एकत्र यावं, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times