भारतात करोना लस बनवणाऱ्या दोन कंपन्यांना चिनी सरकारचा पाठिंबा असलेल्या हॅकर्सनी लक्ष्य केलं आहे. गोलमन सॅक्सशी संबंधित सायफार्मा या कंपनीच्या मते, चिनी हॅकिंग ग्रुप APT10 ने भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूटच्या आयटी इन्फ्रास्ट्रक्चरमधील त्रुटींचा फायदा घेस घुसघोरीचा प्रयत्न केला, असं सायबर इंटेलिजेंस फर्म सायफर्माने म्हटल्याचं वृत्त रॉयटर्सने दिले आहे.
चिनी APT10 या हॅकिंग ग्रुपला स्टोन पांडा म्हणूनही ओळखल जातं. हॅकिंग ग्रुपने दोन्ही कंपन्यांच्या पुरवठा साखळीच्या सॉफ्टवेअरमध्येही घुसखोरी केली आहे. सायबर हल्ल्याचा मुख्य हेतू हा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीला लक्ष्य करणं आणि स्पर्धेत भारतीय कंपन्यांवर आघाडी मिळविण्याचा होता, असं सायफार्माचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार रितेश यांनी सांगितलं. रितेश यांनी ब्रिटीश गुप्तचर संस्था MI6 मध्ये सायबर संबंधित वरिष्ठ अधिकारी पदावर काम केलं आहे.
‘APT10 हे सायबर हॅकर्स सीरम इन्स्टिट्यूटला लक्ष्य करत होते. सीरम इन्स्टिट्यूट अनेक देशांसाठी अॅस्ट्राझेनकाची लस बनवत आहे. सीरममध्ये लवकरच नोव्हाव्हॅक्सचेही मोठ्या प्रमाणात उत्पाद होणार आहे. हॅकर्सना या कंपनीचे अनेक सर्व्हर्स कमकुवत असल्याचे आढळून आले. हॅकर्सनी कमकुवत वेब अॅप्लिकेशन्स आणि कमकुवत सामग्री व्यवस्थापन यंत्रणेवरही बोलले आहेत आणि हे अत्यंत चिंताजनक आहे, असं रितेश म्हणाले.
दरम्यान, या सायबर हल्ल्यासंबंधी चीनने अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तर भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूटनेही या प्रकरणी कुठल्याही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. हॅकिंग ग्रुप APT10 हा चीनच्या मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटीसोबत काम करतो, असं अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने २०१८ मध्ये दिलेल्या एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
भारत, कॅनडा, फ्रान्स अमेरिकासह अनेक देशांमधील करोनावरील लस बनवणाऱ्या कंपन्यांवर सायबर हल्ला केला जाऊ शकतो, असा इशारा मायक्रोसॉफ्टने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दिला होता.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times