म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई पालिकेतील स्थायी समितीतील असमान विकास निधी वाटपावरून आणि भाजपमधील विसंवाद आणखी वाढत चालला आहे. विकास निधीतील दुजाभाव हा मुंबईकरांवर अन्याय आहे. तर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या भायखळ्यातील स्वतःच्या विभागात तब्बल १८ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद केल्याचा मुद्दाही उपस्थित केला आहे.

मुंबई पालिकेत भाजपचे ८३ नगरसेवक असून त्यांना एकूण विकास निधीपैकी ५० टक्क्यांपेक्षा कमी म्हणजे निव्वळ १ कोटी ७१ लाख रुपये एवढाच विकासनिधी वाटप केले आहे. त्याबद्दल भाजपने सोमवारी पुन्हा शिवसेनेवर टीका केली आहे. स्थायी समितीतील निधी वाटपासंदर्भात प्रत्येक वर्षी सर्व गटनेत्यांची बैठक होऊन चर्चा होते. त्यात, निधी वाटपाचे प्रमाण ठरविण्यात येते. मात्र यंदा असमान वाटपाविषयी स्थायी समिती अध्यक्ष्यांकडून सहमती झाल्याचे सांगितले जाते. पण, या असमान निधी वाटपास भाजपने कधीही मान्यता दिलेली नसल्याचे भाजपचे गट नेते प्रभाकर शिंदे यांनी सोमवारी नमूद केले.

स्थायी समिती निधीतून भाजपला ६० कोटी रुपये निधी देताना यशवंत जाधव यांच्या विभाग क्र. २०९ साठी १८ कोटी ५० लाख रुपये निधी देण्यात आला आहे. त्यातील, खर्च केल्या जाणारी कामे आणि त्यासाठी केलेल्या तरतुदींची आकडेवारीही विस्तृत मांडली. दुसरीकडे, महाविकास आघाडीत सहभागी असेलल्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्षाच्या प्रत्येक नगरसेवकास प्रभागात सरासरी साडेतीन कोटी ते चार कोटी रुपये विकासनिधी मिळणार आहे.

स्थायी समितीवरील निधीसंदर्भात भाजपने १७ फेब्रुवारी रोजी २३७ कोटी रुपये निधीची लेखी मागणी केली होती. त्यावर, जाधव यांनी ५५ कोटी रुपये उपलब्ध होतील असे सांगितल्यावर चर्चा थांबवून जो काही निर्णय घ्यायचा तो घ्या, असा पवित्रा घेतल्याचे शिंदे यांनी सांगितले. यावेळी, भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट, विनोद मिश्रा आदी उपस्थित होते.

एकूण निधी वाटप

पक्ष…………….. निधी

शिवसेना-३४२ कोटी रु.

भाजप- १४२ कोटी रु.

काँग्रेस-११० कोटी रु.

राष्ट्रवादी काँग्रेस- २९ कोटी रु.

समाजवादी पक्ष -२४ कोटी रु.

मनसे- १ कोटी रु.

एमआयएम -२ कोटी रु.

एकूण निधी – ६५० कोटी

अध्यक्षांसाठी तरतूद!

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या विभाग क्रमांक २०९ मधील विकास निधीतील तरतूद एकूण १८ कोटी ५० लाख रु.

विविध विकासकामे, सुविधा-९ कोटी रु.

आसने बसविण्यासाठी-१ कोटी रु.

गरजू, गरीब, दिव्यांगांसाठी रोजगारासाठी यंत्रसामग्री-५० लाख रु.

प्रसाधनगृह दुरुस्तीसाठी – १ कोटी रु.

घरगल्य्यांची दुरुस्ती-१ कोटी रु.

चौक, रस्ते नामफलक, सूचनाफलक बसविणे-५० लाख रु.

गरजूंना ताडपत्री पुरविणे-१ कोटी रु.

फुटपाथ सुधारणा, रस्ते, सुशोभीकरण-१ कोटी रु.

झाडांच्या कुंड्या पुरविणे-५० लाख रु.

कचराकुंडी पुरविणे-१ कोटी रु.

म्हाडा वस्तीत नागरी सुविधा-१ कोटी रु.

समाजमंदिर, बालवाडी, व्यायामशाळा बांधणे-१ कोटी रु.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here