या घटनेवरून सर्व स्तरांतून संताप व्यक्त केला असून, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या घटनेची दखल घेतली आहे. आरोपींविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. कठोर कारवाईचे आदेशही संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
हाथरसच्या सासनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नौजरपुर गावात ही घटना घडली. पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरीश शर्मा असे मृताचे नाव आहे. मुख्य आरोपी गौरव शर्मा याच्याविरोधात त्यांनी जुलै २०१८मध्ये छेडछाडीची तक्रार केली होती. त्यानंतर गौरवला अटक करून तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. एका महिन्यानंतर तो जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी गौरवची पत्नी आणि मावशी गावातील एका मंदिरात पूजेसाठी आली होती. तिथे मृताच्या दोन्ही मुलीही होत्या. जुन्या वादातून दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर गौरव आणि अमरीशही तेथे पोहोचले. गौरवने आपल्या काही साथीदारांना फोन करून बोलावले. त्यानंतर आरोपींनी अमरीशवर गोळीबार करून त्यांची हत्या केली. पोलिसांनी या घटनेनंतर गौरव आणि इतर तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यातील दोघांचा अटक करण्यात आल्याची माहिती आहे. फरार आरोपींच्या अटकेसाठी पथके नेमली आहेत. या घटनेनंतर राज्याच्या सुरक्षा आणि व्यवस्थेवर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times