रविराज क्षीरसागर (वय ३२, रा. वारजे ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेत सुदर्शन उर्फ बाल्या बाबुराव पंडित (वय ३०) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा मृतदेह २७ फेब्रुवारी रोजी सूस खिंडीत आढळला होता. पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला आहे, अशी माहिती उपायुक्त पंकज देशमुख यांनी दिली.
पंडित हा राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत पीएचडी करण्याच्या निमित्ताने पुण्यात आला होता. सुतारवाडी भागात तो पेइंग गेस्ट म्हणून वास्तव्यास होता. एका डेटिंग साइटच्या माध्यमातून त्याची आरोपीसोबत ओळख झाली होती. दोन दिवसांपूर्वी त्यांच्यात किरकोळ कारणांवरून वाद झाले होते. आरोपीने पंडितला रात्रीच्या वेळी सूस खिंडीत बोलावून घेतले. त्यानंतर आरोपीने पंडितची हत्या केली. सूस खिंडीत मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपीने पंडितचे सर्व कपडे काढून नेले होती. मात्र, त्याचे पाकीट घटनास्थळी पडले. त्यामध्ये असलेल्या आधारर्ड वरून पंडितची ओळख पटली. पोलिसांनी पंडितच्या संपर्कात असलेल्यांची माहिती काढली. त्यावेळी तो शनिवार व रविवारी एका मोबाइल क्रमांकावर सतत संपर्कात राहात असल्याचे आढळून आले. तो त्या दिवशीच खोलीवरून गायब असायचा. त्यावरून आरोपीची माहिती पोलिसांना मिळाली, असे वरिष्ठ निरीक्षक अशोक शेवाळे यांनी सांगितले.
आरोपी क्षीरसागर याचे काही महिन्यांपूर्वी कुटुंबीयांनी लग्न लावून दिले होते. त्याच्याबद्दल पत्नीलाही सर्व काही समजले होते. तेव्हापासून तो नैराश्यात होता. घरच्यांनी लग्न लावून दिले आणि आपल्यामुळे एका मुलीचे आयुष्य वाया गेले, याची त्याला सल होती. दुसरीकडे पंडित हा काही दिवसांपूर्वी मुलगी बघण्याच्या निमित्ताने गावी गेला होता. त्याने आल्यानंतर त्याने याबाबतची माहिती त्याला दिली होती. त्याच्यापासून पंडित दूर जाणार असल्याची भीती होती. आधीच तो नैराश्यात होता. त्यातूनच त्याने पंडितला रात्री सूस खिंडीत बोलावून घेतले. त्यानंतर धारधार हत्याराने वार करून त्याची हत्या केली. पुरावेही नष्ट केले, अशी माहिती पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी दिली.
आरोपीने केला आत्महत्याचा प्रयत्न
पंडितचा खून करून आरोपी क्षीरसागर हा वारजे परिसरातील त्याच्या घरी गेला. त्या ठिकाणी स्वत:वर वार करून घेतले. तसेच झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी आई-वडील आल्यानंतर तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यानंतर उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्याकडे सुसाइड नोटही सापडली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times