१० लाखांच्या मागे १४० नवीन रुग्ण आढळून येत असतील आणि अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही ५ टक्के किंवा त्यापेक्षा खाली असेल तर करोना व्हायरसचा संसर्ग आटोक्यात आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. सध्या भारत त्याच्या जवळ आहे. भारतात करोनाच्या एकूण रुग्णांची टक्केवारी ५.११ इतकी आहे, असं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं.
गर्दी करणारे मोठे कार्यक्रम घेऊ नका. पार्टी, लग्न सोहळ्यांमध्ये गर्दी होऊ देऊ नका. अन्यता हे कार्यक्रम करोनाचे सुपर स्प्रेडर ठरू शकतात, असा इशारा निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. पॉल यांनी दिला आहे.
देशात मंगळवारी करोनाचे १२ हजारांवर नवीन रुग्ण आढळून आले. तसंच आठवड्याभरानंतर १०० पेक्षा कमी जणांचा करोनाने मृत्यू झाला. तर करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवीन रुग्ण वाढीचा सिलसिला तुटला आहे. एवढचं नाही तर अॅक्टिव्ह रुग्णवाढही आटोक्यात आली आहे.
२४ तासांत १२ हजारांवर नवे रुग्ण
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सकाळी आठ वाजता करोना रुग्णसंख्येबाबतची आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत १२, २८६ नवीन रुग्ण आढळून आले. तर १२,४६४ जण करोनातून बरे झाले. एकूण ९१ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सर्वाधिक महाराष्ट्रातील रुग्णांचा समावेश आहे. महाराष्ट्रात ३०, पंजाबमध्ये १८ तर केरळमधील १३ जणांचा समावेश आहे. २४ फेब्रुवारीनंतर प्रथमच करोना व्हायरसने मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा हा १०० च्या खाली आला आहे. तर देशात संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांची संख्या १ कोटी ११ लाख २४ हजारांवर गेली आहे. यातील १ कोटी ७ लाख ९८ हजार रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर १ लाख ५७ हजार २४८ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे.
करोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी ही ९७.७ टक्के आणि मृत्यूदर हा १.४१ टक्के इतका आहे. जवळपास एका आठवड्यानंतर अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येतही घट झाली आहे. देशात एकूण रुग्णांपैकी महाराष्ट्र आणि केरळमध्ये ६७.८४ टक्के रुग्ण आहेत. तर देशात फक्त ५ राज्यांमध्ये ८० टक्क्यांहून अधिक नवे रुग्ण आहेत. त्यात महाराष्ट्र, केरळ, पंजाब, गोवा आणि गुजरातचा समावेश आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times