नवी दिल्लीः केंद्राच्या तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात ( ) शेतकऱ्यांचे आंदोलन ( ) सुरू आहे. आता शेतकरी संघटनांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपला घेरण्याची तयारी सुरू केली आहे. ४ राज्ये आणि एका केंद्राशासित प्रदेशात विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकांमध्ये आता भाजपविरोधात शेतकरी संघटना प्रचार करणार आहेत.

पुढच्या महिन्यांत पश्चिम बंगाल, तामिळनाडू, पुदुच्चेरी, केरळ आणि आसाममध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. भाजपने निवडणुकीत मोठी शक्ती लावली आहे. यामुळे पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेससमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अशातच कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने मोठी घोषणा केली आहे. भाजपला मतदान करू नका, असं आवाहन पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये करणार असल्याची घोषणा शेतकरी संघटनांनी केली आहे.

१० कामगार संघटनांसोबत आमची बैठक झाली. सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाविरोधात १५ मार्चला कामगार आणि कर्मचारी रस्त्यांवर उतरतील आणि रेल्वे स्थानकांबाहेर धरणे आंदोलन करतील. सरकार शेतकऱ्यांचे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे. पण केंद्र सरकारमध्ये हरयाणाचे जे ३ केंद्रीय मंत्री आहेत त्या मंत्र्यांना त्यांच्या गावात प्रवेश बंदी केली जाईल, असा इशारा स्वराज इंडियाचे संस्थापक योगेंद्र यादव ( ) यांनी दिला.

सकाळी ११ ते दुपारी ४ वाजता एक्स्प्रेस वे रास्ता रोको

संयुक्त किसान मोर्चाची आज बैठक झाली. या बैठकीत १५ मार्चपर्यंतच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ६ मार्चला १०० दिवस पूर्ण होत आहेत. त्या दिवशी शेतकरी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत कुंडली-मानेसर-पलवल एक्स्प्रेस वेवर वेगवेगळ्या ठिकाणी रास्ता रोको करतील, असं योगेंद्र यादव म्हणाले.

पाच राज्यांत भाजपला विरोध करणार

येत्या ८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस आहे. त्यावेळी आंदोलनांच्या ठिकाणी महिलांना पुढे आणलं जाईल. तर ५ मार्चला कर्नाटकमध्ये ‘एमएसपी द्या’ आंदोलन सुरू केले जाईल. ज्यात पिकांसाठी एमएसपी निश्चित करण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे केली जाईल. पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये निवडणुकांदरम्यान शेतकऱ्यांची वेगवेगळी पथकं पाठवण्यात येतील. आम्ही कुठल्याच पक्षाचे समर्थन करणार नाही. मात्र भाजपचा पराभव करण्यासाठी नागरिकांना आम्ही आवाहन करू. तसंच शेतकऱ्यांबद्दल केंद्रातील मोदी सरकारच्या दृष्टीकोनाची माहिती देऊ, असं भारतीय किसान युनियनमधील बलबीर एस राजेवाल यांनी सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here