म. टा. प्रतिनिधी,

महंमदवाडी परिसरात पूजा चव्हाण या युवतीच्या आत्महत्येबाबत पोलिस आयुक्त यांनी गेल्या तीन आठवड्यांपासून पाळलेले मौनव्रत अद्यापही कायम आहे. पोलिस आयुक्तालयात मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आल्यानंतर त्यांनी केलेले सूचक हास्य आणि त्यानंतर बाळगलेले मौन चर्चेचा विषय ठरला आहे. आयुक्तांना याबाबत बोलायचे नाही की बोलू दिले जात नाही, अशीही कुजबूज सुरू झाली आहे.

सैन्यभरतीची प्रश्नपत्रिका फोडणारे रॅकेट उघडकीस आणल्याने या सर्व प्रकाराची माहिती देण्यासाठी पोलिस आयुक्त गुप्ता यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. गुप्ता यांनी प्रश्नपत्रिका फोडण्यात आल्याच्या प्रकरणाची सविस्तर माहिती दिल्यानंतर त्यांना पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणाबाबत विचारणा करण्यात आली. त्यानंतर लगेचच आयुक्तांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली आणि ते तेथून हसत हसत बाहेर पडले. पूजा चव्हाणच्या आत्महत्येच्या घटनेने शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला असताना पोलिस आयुक्त मौन बाळगून आहेत.

आयुक्तांची असंवेदनशीलता

पोलिस आयुक्तांना पत्रकार परिषदेत पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाच्या तपासाबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्या वेळी आयुक्त हसत उठून निघून गेले. या प्रश्नाच्या आधी सैन्यभरती प्रश्नपत्रिका फुटल्याच्या एका प्रश्नावर आयुक्त म्हणाले, ‘हा विषय अतिशय संवेदनशील आहे. लष्कराशी संबंधित आहे. त्यामुळे आपणही संवेदनशीलता पाळू या.’ या उत्तरापाठोपाठ लगेचच आयुक्तांना ‘सर, पूजा चव्हाण हिचाही प्रश्न संवेदनशील आहे. त्या तपासाचे काय झाले, सध्या तपासाची स्थिती काय आहे, याबाबत आम्हाला काही तरी सांगा.’ हा प्रश्न अनपेक्षित असल्याचे दाखवत पोलिस आयुक्त त्यांच्या दालनाकडे निघून गेले.

पूजाचा मृत्यू जबर दुखापतीमुळे

पूजा चव्हाणचा मृत्यू जबर दुखापतीमुळे झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून निष्पन्न झाले आहे. ससून रुग्णालयाकडून याबाबतचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना सादर करण्यात आला आहे. पूजाच्या मणक्याला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे वैद्यकीय अहवालात म्हटले आहे. ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे आणि तज्ज्ञांच्या समितीने याबाबतचा अहवाल मंगळवारी सादर केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here