रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांची मनमानी सुरू आहे. करोनाचे प्रतिबंधक नियम डावलून क्रिकेटसह विविध कार्यक्रमांना त्या परवानगी देत आहेत. राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या या पोलिस अधिकाऱ्यावर सरकार कारवाई करणार काय, असा सवाल करून त्यांना शिवसेनेच्या एका मंत्र्यांचा वरदहस्त असल्यामुळेच पत्की यांच्यावर कारवाई होत नाही, असा घरचा आहेर शिवसेनेचे सदस्य यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिला.
विधान परिषदेच्या सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासात कदम यांनी खेडच्या पोलिस अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारावर टीकेची झोड उठवली, तर त्या भागात दारूच्या बेकायदा हातभट्ट्या सुरू असून, सरकारमध्ये विविध पदे भूषवलेल्या शिवसेनेच्या संबंधित माजी मंत्र्यांवर अधिवेशन संपण्याच्या आधी कारवाई व्हायलाच हवी, अशी आग्रही मागणी विरोधी पक्षनेते यांनी लावून धरली.
खेडमध्ये करोनाप्रतिबंधक नियम डावलून विविध कार्यक्रमांना परवानगी देणाऱ्या आणि राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी गृहमंत्र्यांकडे वेळोवेळी करण्यात आली. मात्र कारवाई झाली नाही, याबद्दल कदम यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी कदम यांनी सभागृहात कार्यक्रमांची छायाचित्र सादर केली. त्यानंतर पत्की यांनी गर्दीमध्ये स्थानिक क्रिकेट स्पर्धेत लावलेली उपस्थिती आणि तेथे करोना नियमांचे झालेले उल्लंघन यासंदर्भात चालू अधिवेशन संपण्यापूर्वी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सभागृहात दिले. याप्रश्नी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, भाई जगताप, भाई गिरकर, निरंजन डावखरे आदींनी उपप्रश्न विचारले. ठाणे घोडबंदर मार्गावरील हनी कोम या हुक्का पार्लर आणि बारवर तत्काळ कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही देशमुख यांनी निरंजन डावखरे यांच्या प्रश्नाला दिले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times