म. टा. प्रतिनिधी, नगरः राज्यात सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले, तशी अवस्था शिवसेनेची नगर शहरात झाली आहे. महापालिकेत सर्वाधिक जागा असूनही शिवसेनेला सत्तेपासून दूर रहावे लागले आहे. राज्यात शिवसेनेसोबत असलेल्या राष्ट्रवादीने नगरमध्ये तिसऱ्या स्थानावर असलेल्या भाजपला साथ दिल्याने शिवसेनेची ही अडचण झाली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर यात सुधारणा होईल, या आशेवर होती. मात्र आता स्थायी समिती सभापतीच्या निवडीतही राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबतच राहून शिवसेनेला दणका दिला आहे.

अहमदनगर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदाची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अविनाश घुले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांना भाजपने साथ दिल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी म्हणजे २०१८ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने साथ दिल्याने भाजपचे बाबासाहेब वाकळे महापौर झालेले आहेत. तेव्हापासून आजपर्यंत शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यात या दोन्ही पक्षांनी यश मिळविले आहे. मधल्या काळात राज्यात सत्तांतर आणि राजकारणातही मोठे बदल झाले, तरीही नगरमधील भाजप-राष्ट्रवादीची दोस्ती कायम राहिली. शहरात राष्ट्रवादीचे संग्राम जगताप आमदार आहेत. ते महापालिकेच्या राजकारणाचेही सूत्रधार आहेत.

२०१८ मध्ये झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नव्हते. शिवसेनेने सर्वाधिक २४ जागा जिंकल्या. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीने १८, भाजपने १४, काँग्रेसने ५ आणि बसपाने ४ जागा जिंकल्या होत्या. समाजवादी पक्षाने १ तर २ जागा अपक्ष उमेदवारांनी जिंकल्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने खेळी करून भाजपला बाहेरून पाठिंबा देत भाजपचे वाकळे यांना महापौरपदी बसविले. त्यानंतर हळूहळू राष्ट्रवादीला इतर पदेही मिळाली.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीने शिवसेनेला सोबत घ्यावे, अशी मागणी सुरू झाली. मात्र, त्यात सुधारणा झालीच नाही. नगरमध्ये राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यात पारंपरिक वैर आहे. पक्षीय नव्हे तर जगताप कुटुंबीय आणि शिवसेना नेते, माजी आमदार अनिल राठोड यांच्यातील वैयक्तिक संघर्षाचेही त्याला स्वरूप आल्याचे मानले जात होते. त्यामुळे राज्यातील सत्तातंरानंतर नसेल तरी राठोड यांच्या निधनानंतर हे वैर संपेल असेही अनेकांना वाटत होते. मात्र, आता सुरू असलेल्या सभापतिपदाच्या निवडणुकीतील राजकारण पहाता वैर संपलेले नाही हे लक्षात येते.

स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडीत शिवसेनेला दूर ठेवण्यासाठी भाजप व राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येत आहेत. पक्षाकडून सभापतिपदासाठी नगरसेवक अविनाश घुले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. गुरूवारी यासाठी निवडणूक होणार आहे. स्थायी समितीत राष्ट्रवादी व शिवसेनेचे प्रत्येकी ५, भाजपचे ४, तर काँग्रेस व बसपचे प्रत्येकी एक असे एकूण १६ सदस्य आहेत. मागील वेळी स्थायी समिती सभापती पदापासून शिवसेनेला दूर ठेवण्यात आले होते.

ऐनवेळी भाजपचे मनोज कोतकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून सभापतिपद मिळविले होते. यावेळीही राष्ट्रवादीचाच सभापती होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येते. आता शिवसेनेकडून काय भूमिका घेतली जाते, ते लवकरच कळेल. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस अशी तीन पक्षांची महाविकास आघाडी आहे. नगरमध्ये मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीत टोकाचा विरोध आहे. त्याचा फायदा तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपला होत आहे. शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हा विषय राज्यपातळीवर नेऊन पाहिला, मात्र त्याचाही उपयोग झाला नाही.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here