भावनगर: गुजरातमधील भावनगरमध्ये मंगळवारी एका माहिती अधिकार कार्यकर्त्याची घरात घुसून हत्या करण्यात आली. जिल्ह्यातील घोघा तालुक्यात ही घटना घडली. तर माहिती अधिकार कार्यकर्त्याची मुलगी हल्ल्यात जखमी झाली आहे. तिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

अमराभाई बोरिचा (वय ५०) असे हत्या झालेल्या माहिती अधिकार कार्यकर्त्याचे नाव आहे. त्यांच्यावर सळ्या, तलवार आणि भाल्याने हल्ला केल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. सुरुवातीला आरोपींनी त्यांच्यावर दगडफेक केली. त्यानंतर अमराभाई हे स्वतःचा बचाव करण्यासाठी घरात आले. आरोपींनी दगडफेक केल्यानंतर त्यांच्या घराचे फाटक तोडले. घरात घुसून त्यांच्यावर लोखंडी सळ्या, तलवारीने हल्ला केला, अशी माहिती त्यांची मुलगी निर्मला हिने दिली.

मंगळवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. जवळपास ५० लोक गावातून डीजे वाजवत जात होते. त्याचवेळी निर्मला आणि तिचे वडील अमराभाई घराबाहेरच उभे होते. काही वेळानंतर ते लोक परत आले आणि त्यांच्यावर दगडफेक करू लागले. निर्मलाने सांगितले की, तिच्या वडिलांना पोलीस संरक्षण देण्यात आले होते. तरीही आरोपी शस्त्रांसह घरात घुसले आणि तिच्या वडिलांवर हल्ला करून त्यांची हत्या केली.

अमराभाई यांच्यावर २०१३ साली सुद्धा हल्ला झाला होता. त्या हल्ल्यात त्यांचा पाय जायबंदी झाला होता. दरम्यान, या घटनेचा पोलीस तपास करत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here