जळगावमधील शासकीय महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसंच, या प्रकरणात एका पोलीस कर्मचाऱ्याचं नाव पुढं येतंय. त्यामुळं राज्यात संतापाची लाट उसळली आहे. आज अधिवेशनातही या प्रकरणावरुन विरोधकांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.
हा गंभीर विषय आहे. मी संविधानाचं पालन करणारा व्यक्ती आहे. पण राज्यात आमच्या आया बहिणींची होत असलेली थट्टा पाहता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याशिवाय पर्याय नाही. या सरकारवर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली आहे, असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
नवाब मलिकांची हरकत
मुनगंटीवारांनी केलेल्या राष्ट्रपती राजवटीच्या मागणीवरुन नवाब मलिक यांनी आक्षेप घेतला आहे. मुनगंटीवार राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी देत आहेत. धमक्या देणं योग्य नाही. त्यामुळे मुनंगटीवार यांचं वाक्य कामकाजातून काढून टाकावं, अशी मागणी मलिक यांनी केली. तर, विधानसभा अध्यक्षांनी मलिक यांच्या मागणीनंतर मुनगंटीवार यांचे वाक्य तपासून कामकाजातून काढून टाकण्यात येईल, असं म्हटलं आहे.
गृहमंत्र्यांची माहिती
‘जी घटना घडली त्याची संपूर्ण माहिती घेण्याचं काम सुरु आहे. व्हिडीओ तसंच इतर सर्व माहिती एकत्र केला जात असून जबाबही नोंदवले जात आहेत. याची संपूर्ण चौकशी झाल्यानंतर कडक कारवाई करण्यात येईल,’ अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times