म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर: पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरात वाढ करत सर्वसामान्यांना महागाईच्या खाईत लोटणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात रान उठविणार असल्याची माहिती माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते यांनी पत्रकार बैठकीत दिली. राज्य सरकारही शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठिशी असल्याचे दिसत नाही. त्यामुळे ते तरी कुठे आमचे आहेत, असा सवाल करत या सरकारविरोधातही राज्यभर आंदोलनाचा भडका उडवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडीचा घटक असलेल्या या संघटनेने सरकार विरोधात आंदोलनाचा इशारा देत घरचा आहेर दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद वाढविण्यासाठी राज्यभर सभासद नोंदणी अभियान सुरू करण्यात आली आहे. या निमित्ताने आयोजित पत्रकार बैठकीत शेट्टी यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसात पेट्रोल व डिझेलची दर प्रचंड वाढत आहेत. गॅसच्या दराचा भडका उडाला आहे. तीस रूपयेला मिळणारे पेट्रोल ९८ रूपये लिटरने विकले जात आहे. मग राहिलेले ६८ रूपये कुणाच्या खिशात जात आहेत याचा शोध घेण्याची गरज आहे. रासायनिक खतांच्या दरात वाढ करत शेतकऱ्यांना अडचणीत आणले जात आहे.

कृषी विधेयक आणून केंद्र सरकार शेतकऱ्यांना गुलाम करत आहे असा आरोप करून ते म्हणाले, या सर्व पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडूनही कोणताच दिलासा मिळताना दिसत नाही.त्यामुळे या सरकारला तर आम्ही आमचे सरकार कसे म्हणायचे असा प्रश्न आम्हाला पडत आहे.
केंद्र व राज्य सरकार शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या विरोधात असल्याचे दिसत असल्याने या दोन्ही सरकार विरोधात राज्यभर आंदोलन करणार असल्याची घोषणा करताना शेट्टी म्हणाले, आता निर्णायक लढाईची वेळ आली आहे. आम्ही ती करणार आहे. आठ दिवसात त्याचे टप्पे ठरविण्यात येतील. त्यानंतर आंदोलनाचा भडका उडेल. दिल्लीत जे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे, ते केवळ पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यातील शेतकऱ्यांचे नाही, ते देशातील सर्व शेतकऱ्यांचे आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रात मोठा लढा उभारण्यात येईल.

यावेळी प्रदेशाध्यक्ष प्रा. जालिंधर पाटील, वैभव कांबळे, जनार्दन पाटील, राजेंद्र गड्ड्यानवार संदीप जगताप आदि उपस्थित होते. यावेळी संदीप कारंडे व रामदास कोळी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here