म. टा. प्रतिनिधी, जळगाव: शहरातील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात काही पोलीस कर्मचारी व इतर बाहेरच्या व्यक्तींनी मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यासंबंधी सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याने खळबळ उडाली आहे. संघटनांकडे या महिलांनी दिलेल्या माहितीचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. या घटनेचे पडसाद विधानसभेतही उमटले. गृहमंत्र्यांच्या आदेशानतंर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या प्रकरणी वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांची समिती नेमून त्यांच्याकडून या घटनेची चौकशी केली जाणार असल्याची माहिती दिली आहे.

महिला व बाल कल्याण विभागामार्फत गणेश कॉलनीतील वसतिगृहात निराधार व अन्याय, अत्याचार झालेल्या महिला व मुलींच्या निवारा-भोजनाची व्यवस्था केली जाते. या वसतिगृहात गैरप्रकार घडत असल्याच्या तक्रारी होत्या. या पार्श्वभूमीवर जननायक फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोज पिंजारी, फरीद खान, मंगला सोनवणे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी वसतिगृहात भेट दिली.

वसतिगृहातील महिलांकडून तक्रारी

यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांना आतमध्ये प्रवेश देण्यात आला नव्हता, मुली बाहेरूनच खिडकीतून आपल्यावर बेतलेले प्रसंग ओरडून सांगत होत्या. या मुली बोलण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांनाही संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून मज्जाव केला जात होता. या महिलांच्या तक्रारीनुसार १ मार्च रोजी काही पोलीस कर्मचारी व बाहेरील पुरुषांनी मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडले. काही कर्मचाऱ्यांच्या संगनमताने बाहेरील लोकांना व पोलिसांना चौकशीच्या नावाखाली आतमध्ये प्रवेश देऊन अनैतिक कृत्य केले जात असल्याचे सांगितले. तसेच ज्या मुली विरोध दर्शवतात, त्यांना मारहाण करण्याची धमकी देत असल्याच्या तक्रारी देखील येथील महिला करीत होत्या. त्या खिडकीतून तक्रारी करीत असल्याचा व्हिडिओ काही पदाधिकाऱ्यांनी तयार केला. या वसतिगृहातील दोघा महिलांमध्ये वाद झाला होता. त्यातूनच हा प्रकार घडला आहे. तसेच यातील एका महिलेनेच या तक्रारी केल्याचे समोर येत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडे केली तक्रार

जननायक फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन तक्रार केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना बोलून सूचना केल्या. यावेळी आशादीप वसतिगृहात गेल्यानतंर त्यांना महिला व मुलींना भेटू दिले नाही. तसेच तेथील महिलांनी खिडकीमधून केलेल्या तक्रारींची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली. यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेले व्हिडिओ व्हायरल झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. तसेच या प्रकरणाचे पडसाद देखील विधानसभेत उमटले होते.

वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांच्या पथकाकडून चौकशी- जिल्हाधिकारी

आशादीप महिला वसतिगृहात दोन महिलांमधील वाद व वसतिगृहातील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे. जिल्हाधिकारी म्हणाले, की आशादीप वसतीगृहातील प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. त्यासाठी वरिष्ठ महिला अधिकारी, डॉक्टरांचे पथक चौकशीसाठी नेमले आहे. चौकशीत आरोपात तथ्य असल्यास संबंधितावर कडक कारवाई करू. वसतिगृहात २४ तास पोलिसांचे पथक तैनात ठेवणार आहेत.

चौकशीत दोषी आढळल्यास गुन्हे- पोलीस अधिक्षक प्रवीण मुंडे

पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मूंडे यांनी सांगितले की, आशादीप वसतिगृहातील प्रकाराची वरिष्ठ महिला अधिकारी चौकशी करीत आहेत. जी महिला व्हिडिओत सांगते आहे, ते नेमके कोणाबद्दल ते कळत नाही. या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. चौकशीत जे समोर येतील, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहे. तसेच या प्रकरणाची वरिष्ठांनाही माहिती दिली आहे.

असा कुठलाही प्रकार नाही- महिला व बालिकास अधिकारी

दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानतंर लगेचच तहसीलदारांसह या ठिकाणी भेट देवून चौकशी केल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेसी यांनी दिली. तसेच या ठिकाणी दोन महिलांचा वाद झाला होता. त्यातील एका महिलेने याबाबतच्या तक्रारी केल्या आहेत. दरम्यान असा कुठलाही प्रकार या ठिकाणी घडलेला नाही. तरी देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने एका समितीकडून याबाबत चौकशी केली जात आहे. यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचेही परदेसी यांनी सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here