मुंबई : भारताच्या औद्योगिक प्रगतीत काही मोजक्या उद्योजकांची नावे आवर्जून घेतली जातात. ज्यांनी स्वातंत्रपूर्व काळात प्रतिकुल परिस्थितीत देखील सामाजिक बांधिलकी जपत औद्योगिक विकासात योगदान दिले. त्यातील एक नाव म्हणजे टाटा समूहाचे संस्थापक आणि कुशाग्र बुद्धिमत्तेचे उद्योजक जमशेटजी नुसेरवानजी टाटा यांचे आहे. जमशेटजी टाटा यांची आज १८२ वी जयंती आहे. ( Birth Anniversary Today) त्यानिमित्त टाटा समूहाचे प्रमुख यांना आदरांजली वाहिली.

जमशेटजी नुसेरवानजी टाटा यांचा जन्म ३ मार्च १८३९ रोजी झोराष्ट्रियन कुटुंबात नवसारी येथे झाला. तिथेच त्यांचे बालपण आणि प्राथमिक शिक्षण झाले. सध्या नवसारी गुजरातमधील सूरतजवळ आहे.

पुढे जमशेटजी यांनी वयाच्या १३ वर्षी मुंबई गाठली आणि इथूनच त्यांच्या आकांक्षाना बळ मिळाले. जमशेटजी यांनी एल्फिस्टन महाविद्यालयात आपले शिक्षण पूर्ण केले आणि वडिलांच्या व्यवसायात रुजू झाले. १८६१ आणि १८६५ च्या अमेरिकन युद्धात जागतिक बाजारात निर्माण झालेल्या कापसाचा तुटवडा भरून काढण्यासाठी टाटा यांच्या वडिलांची कंपनी कापूस पुरवठ्याचे काम करत होती. या व्यवसायात जमशेटजी यांचे काही मन रमले नाही. त्यांनी १८६८ मध्ये तब्बल २१००० रुपयांच्या भांडवलासह वयाच्या २९ व्या वर्षी स्वतःचा व्यवसाय सुरु केला. टाटा समूहाच्या माहितीनुसार इथेच टाटा समूहाची पायाभरणी झाली.

मुंबईतील गिरणी व्यवसायाशी टाटा समूहाचे जुने संबंध आहेत. जमशेटजी टाटा यांनी मुंबईत गिरणी खरेदी केली आणि नंतर विक्री देखील केली. त्यानंतर त्यांनी नागपूरमध्ये गिरणी उभारली ती पुढे ‘इम्प्रेस मिल’ म्हणून ओळखली जाऊ लागली. कापड व्यवसायात जमशेटजी यांचे काही निर्णय चुकले देखील मात्र ते खचले नाही किंवा थांबले नाहीत. त्यांनी नवनव्या व्यवसायात विस्तार केला. त्यातून टाटा स्टीलचा वटवृक्ष उभा राहिला.

जमशेटजी यांना कामगारांच्या प्रती प्रचंड आत्मीयता होती. कामगारांना योग्य मोबदला मिळावा, बोनस मिळावा तसेच त्यांना काही दुखापत झाल्यास त्यांना भरपाई मिळावी, अशी जमशेटची यांची भावना होती. तीच परंपरा आजही टाटा समूहात जपली जात आहे. जमशेटजी यांचे पणतू रतन टाटा यांनी आजही कामगारांप्रती स्नेहभाव जपला आहे.

जमशेटजी यांना राजकारणात देखील रुची होती. त्यांनी स्वदेशी चळवळीचे समर्थन केलं होते. जमशेटजी यांनी काही काळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सक्रिय सहभाग घेतल्याचा उल्लेख त्यांच्यावर आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या निवडक आत्मचरित्रात आहे.

तरुणांनी परदेशी उच्च शिक्षण घ्यावे, सनदी सेवेत रुजू व्हावे, यासाठी जमशेटजी टाटा यांनी विशेष निधी सुरु केला होता. मुंबईतील ऐतिहासिक ताज महाल हॉटेलची सुरुवात त्यांच्याच नेतृत्वात १९०३ साली झाली. मुंबई शहर हे युरोपातील शहरांच्या दर्जाचे असावे, असे जमशेटजी यांचे स्वप्न होते. जमशेदपूर हे त्यांच्या नावे टाटा समूहाने वसवलेले औद्योगिक नगर आहे.

जमशेटजी यांचा विवाह हिराबाई दाबो यांच्याशी झाला. त्यांना दोराबजी आणि रतनजी टाटा अशी दोन मुले होती. जमशेटजी यांचे १९ मे १९०४ रोजी वयाच्या ६५ व्या वर्षी निधन झाले. दुर्दैवाने दोन महिने आधीच त्यांची पत्नी हिराबाई यांचे निधन झाले होते.

टाटा समूहाचा आवाका आज सर्वच प्रमुख औद्योगिक क्षेत्रात आहे. त्याची उलाढाल ११० अब्ज डॉलरच्या पुढे असून जवळपास जगभरात ७ लाख रोजगार दिले आहेत. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन असून समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here