म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर: पोलिस ठाण्याची पाहणी करायला साहेब येत असल्याने त्यांच्या स्वागताची तयारी करत असतानाच दोन गुन्हेगारांनी धूम ठोकल्याने शाहूवाडी पोलिसांची पार भंबरी उडाली. आता साहेबांना सांगायचे काय या प्रश्नाने पोलिस अस्वस्थ झाले. फरारीमधील एक आरोपी काही मिनीटातच सापडला पण, दुसरा पकडण्यासाठी तीन तासाची धावपळ करावी लागली. एखाद्या सिनेमातील प्रसंगाप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यात घडलेल्या या घटनेने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

या घटनेची सविस्तर माहिती अशी, मंगळवारी सायंकाळी दोघेजण शाहूवाडी पोलिस ठाण्यात आले. दारू पिवून तरर.. असलेल्या या दोघांना पोलिस ठाण्यात फिर्याद द्यायची होती. मलकापूरहून गावी जात असताना त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली होती. त्यामध्ये ते किरकोळ जखमी झाले होते. त्याची फिर्याद देण्यासाठी ते पोलिस ठाण्यात आले होते. फिर्याद द्यायची राहिली बाजूलाच. या दोघांनी पोलिसांनाच शिवीगाळ केली. तेथे असलेल्या सेतू कार्यालयाची तोडफोड केली. नशेत असल्याने आपण काय करत आहे, हे त्यांनाच कळत नव्हते. नशेतच त्यांनी स्वत:ला जखमी करून घेतले. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी रूग्णालयात नेले. तेथेही त्यांनी धुमाकूळ घातला. डॉक्टरासह कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. तेथेही तोडफोड करत दंगा केला.

या सर्व प्रकारानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. बैथूल अब्दुल रहिमान शेख ( वय, २० रा. जरीमरी बाबामिया चाळ, इंदिरानगर कुर्ला साकीनाका वेस्ट मुंबई ) व आलम शब्बीर शेख ( रा. टेकोली पैकी बाणदारवाडी, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर सध्या रा. अमृतनगर, मुंब्रा मुंबई) अशी त्यांची नावे. या दोघांना बुधवारी न्यायालयात नेत असताना त्यातील एकाने अचानक पोलिसावर हल्ला केला. यामध्ये पोलिस हवालदार चिंतामण सोमा बांबळे जखमी झाले. या धावपळीत पोलिसांच्या तावडीतून सुटून दोघेही फरार झाले.

तावडीतून आरोपी पळाल्याने पोलिसच हादरले. त्यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. एखाद्या सिनेमातील प्रसंगाप्रमाणे पाठलाग सुरू झाला. आलम शब्बीर शेख हा आरोपी शेतात असलेल्या ऊसात पळाला. पण काही मिनीटातच पोलिसांनी झडप टाकत त्याला पकडले. दुसरा मात्र फरार झाला. त्याचा शोध सुरू झाला, तीन तास झाले तरी तो हाती लागत नसल्याने पोलिसांची भंबरी उडाली. स्थानिक पोलीस, गुन्हे अन्वेषण शाखा, शाहूवाडी व करंजोशी येथील स्थानिकांनी परिसर पिंजून काढला. करंजोशी येथे स्थानिकांच्या मदतीने त्या आरोपीस पकडण्यात पोलिसांना यश आले.

शाहूवाडी पोलिस ठाण्याची पाहणी करण्यासाठी बुधवारी एक वरिष्ठ पोलिस अधिकारी येणार होते. त्यांच्या स्वागताची तयारी पोलिस करत होते. मात्र, अचानक दोन आरोपी पळून गेल्याने त्यांची झोप उडाली. साहेबांच्या स्वागताऐवजी त्यांचा पूर्ण दिवस आरोपींना शोधण्यातच गेला.

या प्रकरणातील बैथूल हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर मुंबईत अनेक गुन्हे दाखल आहेत. दोघे आरोपी हे एकमेकांचे मित्र आहेत. याप्रकरणी पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी ठाण्यास भेट दिली. पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख करीत आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here