महापालिकेने वारंवार आवाहन केल्यानंतरही मालमत्ता कराचा भरणा करण्यात मुंबईकरांनी उदासीनता दाखवली आहे. सन २०२०-२१ चा कर भरणा करण्यासाठी ८ मार्चची मुदत देण्यात आली असून ही तारीख उलटल्यास ९ मार्चपासून कराच्या दोन टक्के इतका दंड ठोठावण्यात येणार आहे.
पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या घरांना माफ करण्याच्या निर्णयात अद्याप पुरेशी स्पष्टता आलेली नाही. राज्य सरकारने करातील फक्त दहा टक्के सर्वसाधारण कर माफ केला असून उर्वरित कराचा भरणा नागरिकांना करावा लागणार आहे. त्यावरून गोंधळ सुरू असतानाच मार्च २०२० पासून मुंबईवर करोनाचे संकट आले. त्यात महापालिकेचे कर निर्धारण आणि संकलन विभागाचे कर्मचारी गुंतल्याने गेल्या वर्षी मालमत्ता धारकांना कर देयके पाठवता आलेली नाहीत. अखेर डिसेंबर महिन्यात ही देयके पाठवण्यात आली. देयके पाठवल्यानंतर ती ९० दिवसांत भरण्याची मुदत ८ मार्च रोजी संपत आहे.
वाचा:
मुंबईत सुमारे साडेचार लाख मालमत्ताधारक असून त्यांच्याकडून २०२०-२१ मध्ये सुमारे साडेचार हजार कोटी रुपये करवसुलीचे लक्ष्य प्रशासनाने ठेवले होते. करोनामुळे यंदा हे लक्ष्य गाठण्यात पालिकेला पुरेसे यश आलेले नाही. डिसेंबर अखेरपर्यंत सुमारे दोन हजार कोटी वसूल करता आले आहेत. मालमत्ता कर हा पालिकेच्या उत्पन्नातील महत्त्वाचा स्रोत आहे. करोनामुळे विकास नियोजन शुल्क व प्रीमियममधून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने पालिकेचे कंबरडे मोडले आहे. त्यात अपेक्षित मालमत्ता करवसुली न झाल्याने प्रशासन चिंतेत आहे.
पालिकेची गेल्या काही वर्षांपासून सुमारे १५ हजार कोटींची मालमत्ता कर थकबाकी आहे. त्यासाठी वेळोवेळी कारवाई, जप्ती, लिलाव अशा कारवायांनंतर ४०० कोटींच्या आसपास थकबाकी काही महिन्यांपर्यंत वसूल करण्यात आली आहे. यंदा पालिकेची आर्थिक स्थिती खालावलेली असल्याने अधिकाधिक महसुलाची आवश्यकता आहे. मालमत्ताधारकांना नोटिसा पाठवूनही टाळाटाळ केली जात असल्याने आता दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्याचे ठरवण्यात आले आहे.
कर भरा, कारवाई टाळा
९ मार्चनंतर थकबाकी भरेपर्यंत दरमहा दोन टक्के दराने दंड वसूल करण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. दिलेल्या मुदतीत कर भरणा करा व जप्ती, अटकावणी, लिलावापासून दूर राहा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times