खेड रेल्वे स्टेशनवर आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा प्रकार घडला. सदर विवाहितेचे नाव हर्षाली हर्षद पवार (३० वर्षे) असे आहे. ती दापोली जवळच्या फरारी येथील आहे. सासू, सासरे व दीर त्रास देत असल्याने त्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार घर सोडून ती थेट खेड रेल्वे स्टेशनात पोहचली. तिथे थेट ती ट्रॅकवर उतरल्याने उपस्थित प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. काही वेळातच खेड स्टेशनात मत्स्यगंधा एक्स्प्रेस येणार होती. त्यामुळे प्रंसगावधान दाखवून प्रवाशांनी ट्रॅकवर उतरत सदर महिलेची समजूत घातली व तिला आत्महत्येपासून परावृत्त केले. या महिलेला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर खेड पोलिसांच्या हवाली केले.
खेड पोलिसांनी संपूर्ण प्रकार समजून घेतला व नंतर पुढील पावले उचलली. सदर महिलेचा नवरा नोकरीनिमित्त मुंबईत वास्तव्याला आहे. त्याला फोन करून पोलिसांनी घडलेल्या प्रकाराची कल्पना दिली. त्याचवेळी पोलिसांनी दापोलीहून सासरच्या मंडळींना बोलावून घेतले. पोलिसांनी खाक्या दाखवताच महिलेचा छळ करणारी सासरची मंडळी वठणीवर आली. आम्ही यापुढे हर्षालीचा छळ करणार नाही, असे सासू, सासरे व दीर या तिघांकडून पोलिसांनी लिहून घेतले. त्यानंतर पीडित महिलेनेही माझी आता सासरच्या मंडळींविरुद्ध कोणतीही तक्रार नसल्याचे सांगितले आणि या संपूर्ण प्रकरणाचा शेवट चांगला झाला.
Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines