म. टा. वृत्तसेवा,

केंद्र सरकाने बंदी घातलेल्या मारुती कंपनीच्या बीएस-४ श्रेणीच्या कार भंगारात खरेदी करून या कारची बनावट कागदपत्राच्या आधारे वेगवेगळ्या राज्यांत नोंदणी करून त्यांची विक्री करणाऱ्या ९ जणांच्या टोळीला गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने अटक केली आहे. या टोळीने अशाप्रकारे विकलेल्या तब्बल ७ कोटी १५ लाख रुपये किमतीच्या १५१ कार पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. या टोळीने बनावट चेसीस नंबर तयार करण्यासाठी वापरलेले मशिन, गाड्यांचे व्यवहार, नोंदणी, विक्रीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे तयार करण्याकरिता वापरलेले लॅपटॉप, प्रिंटर, स्टॅम्प पेपर, रबरी शिक्के, बनावट चलन, मोबाइल फोन आदी मुद्देमाल या टोळीकडून हस्तगत केल्याची माहिती पोलिस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी दिली.

बीएस-४ इंजिन असलेली वाहने आता बाद झाल्याने मारुती सुझुकी कंपनीच्या सियाज, ब्रिझा, सेलेरिओ, वॅगनआर, इको, बॅलेनो, एस क्रॉस अशा वेगवेगळ्या कार पुराच्या पाण्यामध्ये खराब झाल्याने कंपनीने त्या लिलावात विकल्या होत्या. यातील ४०७ कार चेंबूर येथील ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चर्रस प्रा. लि. या कंपनीने विकत घेतल्या होत्या. मारुती कंपनीने या कार ताब्यात देण्यापूर्वी सर्व कारच्या चेसीस क्रमांक कट केले होते. मात्र आनम अस्लम सिद्दीकी (४२) या आरोपीने व त्याच्या साथीदारांनी या कारवर बनावट चेसीस क्रमांक टाकले. तसेच जुन्या नोंदणीकृत गाड्यांचे इंजिन व चेसीस क्रमांकांची बनावट व खोटी कागदपत्र तयार केली. त्यानंतर या टोळीने बनावट कागदपत्रांच्या आधारे या कारचे वेगवेगळ्या राज्यातील आरटीओ कार्यालयांत वेगवेगळ्या ग्राहकांच्या नावांनी नोंदणीदेखील केली.

या टोळीने पनवेलच्या शिरढोण भागात कार्यालय थाटून या कार सेकंड हँड असल्याचे ग्राहकांना खोटे सांगून त्यांची २ ते ३ लाखांमध्ये विक्री करण्यास सुरुवात केली. गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाला ही माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एन. बी. कोल्हटकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश गज्जल व त्यांच्या पथकाने आरोपींच्या कार्यालयावर छापा टाकून यातील काही आरोपींना अटक केली होती. गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा अधिक तपास केल्यानंतर ही बनावटगिरी उघड झाली. त्यानंतर मध्यवर्ती कक्षातील पथकाने महाराष्ट्रातील विविध जिल्हे, दिल्ली, हरयाणा, गुजरात, राजस्थान, तेलंगण, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, पंजाब इत्यादी राज्यांत या टोळीने विकलेल्या तब्बल सात कोटी पंधरा लाख रुपये किंमतीच्या १५१ कार हस्तगत केल्या.

विविध ठिकाणांहून आरोपींची धरपकड

पोलिसांनी या प्रकरणी आनम अस्लम सिद्दीकी (४२), शाबान रफिक कुरेशी (३२), मनोहरप्रसाद व्यंकटराव जाधव (३१), वसिम मोहम्मद उमर शेख (३१) या चौघांना पनवेल येथून अटक केली. त्यानंतर गौरव सुभाषचंद्र देम्बला (३२) आणि प्रशांत एस. नरसय्या शिवरार्थी (२६) या दोघांना दिल्ली व हैद्राबाद येथून तसेच राशिद खान अहमद खान (४२), चंद्रशेखर ज्ञानदेव गाडेकर (३१) या दोघांना पनवेलमधून तर इम्रान युसूफ चोपडा (३८) याला अहमदाबाद येथून अटक केली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here