म. टा. विशेष प्रतिनिधी,

धावत्या रेल्वेगाडीतून प्रवाशांच्या बॅगा बाहेर फेकत गाडीखाली उड्या घेऊन चोरटे पळून गेल्याच्या दोन घटना ०८२४३ बिलासपूर- भगत की कोठी आणि ०२८५१ विशाखापट्टनम- हजरत निजामुद्दीन विशेष रेल्वेत नागपूर- दिल्ली मार्गावर भरतवाडा रेल्वे स्थानकाजवळ पहाटेच्या सुमारास घडल्या.

भगत की कोठी ही रेल्वेगाडी नागपूर रेल्वेस्थानकावर आपल्या निर्धारित वेळेत म्हणजे १२.३० वाजताच्या सुमारास पोहोचली. काही वेळ थांबून गाडी पुढील प्रवासाला निघाली. चोरी करणारे आधीच गाडीत असावेत, असा अंदाज वर्तविला जात आहे. भरतवाडा रेल्वेस्थानकाजवळ गाडी येताच चोरट्यांनी साखळी ओढून गाडी थांबविली. महिलांच्या डब्यात शिरले. यावेळी सारे प्रवासी साखर झोपेत होते. यावेळी तीन महिलांच्या बॅग डब्याबाहेर फेकल्या आणि अंधाराचा फायदा घेऊन चोरटे गाडीतून खाली उडी मारून पळून गेले.

भगत की कोठी रवाना होत नाही तोच त्याच गाडीमागे असलेल्या विशाखापट्टणम-हजरत निजामुद्दीन विशेष रेल्वे गाडीचीही साखळी ओढण्यात आली. गाडी थांबताच अंधाराचा फायदा घेत चोरटे पळून गेले. या गाडीलाही जवळपास १५ ते १७ मिनिटे रोखून धरण्यात आले होते. दोन्ही गाड्या भरतवाडा रेल्वे स्थानकापासून ३०० ते ५०० मीटर अंतरावर थांबविण्यात आल्या. विशेष म्हणजे या गाड्यांना भरतवाड्याला थांबा नाही. दोन्ही गाड्या इटारसीला थांबल्या. तीन प्रवाशांनी इटारसी लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार नोंदविली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून बॅग जप्त केल्या. बॅगमधून ६ मोबाइल जप्त करण्यात आले. कदाचित बॅगमधील रोख आणि दागिने घेऊन चोरटे पळून गेले असावेत अशी शक्यता वर्तविली जात आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here