म. टा. प्रतिनिधी, नगर : शेतातील तळ्याजवळ झालेल्या खुनाचा तो प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता. आरोपीनेही त्याला पाहिले होते. म्हणून आरोपीने त्याच्या घरी जाऊन त्याच्यावरही हल्ला चढविला. सुरवातीला गैरसमजातून घटना पाहणाऱ्यालाच आरोपी समजण्यात आले. मात्र, तपासात खरा प्रकार उघडकीस आला. आरोपी पकडला गेला. जखमी साक्षीदाराचीच कोर्टात साक्ष महत्वाची ठरली आणि खऱ्या खुन्याला झाली. आरोपीचा साक्षीदारालाच गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न फसला. एखाद्या चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे घडलेल्या या घटनेचा आज कोर्टात निकाल लागला आणि खऱ्या आरोपीला शिक्षा झाली.

तालुक्यातील चिचोंडी गावात जुलै २०१७ मध्ये घडलेली ही घटना. कांद्याच्या बिलाच्या वादातून केशव दशरथ जऱ्हाड यांचा खून झाला. त्यातील खरा आरोपी अरूण हरीभाउ तुपे (वय ४२ रा. चिचोंडी, ता. पाथर्डी) याला न्यायालयाने जन्मठेप आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. आरोपीच्या बनावामुळे आणि गैरसमजातून अडकलेले संजय पेंटर उर्फ संजय पेत्रस भिंगारदिवे यांची पूर्वीच सुटका झाली असून त्यांचीच साक्ष महत्वाची ठरली.

चिचोंडी गावातील खारोळ्याच्या तळ्याजवळ २३ जुलै २०१७ ला ही घटना घडली होती. आरोपी अरूण हरीभाउ तुपे याने केशव जऱ्हाड यांना कांद्याच्या राहिलेल्या पट्टया (बिल) देण्याच्या वादातून मारहाण केली. ही घटना संजय पेंटर उर्फ संजय पेत्रस भिंगारदिवे यांनी पाहिली. ते भांडण सोडविण्यासाठी गेले. तेव्हा आरोपी तुपे यांनी त्यांनाही दगड फेकून मारला. भिंगारदिवे यांनी तो दगड हुकविला आणि घाबरून तेथून पळून गेले. त्यांनी ही घटना पाहिल्याचे लक्षात आल्याने आरोपी तुपे त्यांचा पाठलाग करीत त्यांच्या घरी गेला. घरात घुसून आरोपीने भिंगारदिवे यांच्यावर चाकूने वार केले. त्यात भिंगारदिवे जखमी झाले. त्यानंतर आरोपी तुपे पुन्हा तळ्याजवळ गेला. त्याच चाकूने त्याने जऱ्हाड यांच्यावरही वार केले. गंभीर जखमी झालेले जऱ्हाड यांचा मृत्यू झाला.

मात्र, आरोपी तुपे याने चलाखी केली. त्याने जऱ्हाड यांचे नातेवाइक प्रमोद जऱ्हाड यांना फोन करून सांगितले की, ‘संजय पेंटरने केशव तात्याला खारोळ्याच्या तळ्याजवळ चाकून मारले आहे.’ त्यावर जऱ्हाड यांनी विश्वास ठेवला. त्यामुळे पोलिसांकडे त्यांनी तशीच फिर्याद दिली. पोलिसांना सुरुवातीला भिंगारदिवे यांच्याविरूद्धच गुन्हा दाखल केला. मात्र, तपास करताना पोलिसांना संशय आला. त्यांनी सर्व घटनाक्रम आणि संजयच्या जखमा, त्याने दिलेली माहिती यांची जुळवाजुळव केली असता संजय नव्हे तर तुपे हाच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे संजय भिंगारदिवे यांना गुन्ह्यातून वगळण्यात आले आणि तुपे याला अटक करून त्याच्याविरूद्ध न्यायालयात दोषारोपत्र पाठविण्यात आले. पाथर्डी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक वाय. एस. राक्षे यांनी तपास पूर्ण केला.

या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश अशोककुमार भिल्लारे यांच्यासमोर झाली. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील मंगेश दिवाणे आणि अनिल ढगे यांनी बाजू मांडली. सुनावणी दरम्यान सरकारपक्षाकडून आठ साक्षिदार सादर करण्यात आले. त्यामध्ये प्रत्यदर्शीसह मृत जऱ्हाड यांची पत्नी, वैद्यकीय अधिकारी, पोलिस यांच्या साक्ष नोंदवल्या. त्यांची साक्ष आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी तुपे याला दोषी ठरविले. त्याला खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप आणि विविध कलमान्वये एकूण २० हजार रुपये दंड अशी शिक्षा देण्यात आली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here