महापालिका स्थायी समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अविनाश घुले यांची आज बिनविरोध निवड झाली. शिवसेनेचे उमेदवार विजय पठारे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. वरिष्ठांच्या सूचनेनुसार आपण माघार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपने मात्र, उमेदवारच दिला नव्हता. उलट घुले यांचा अर्ज दाखल करताना भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यासह अन्य कार्यकर्तेही उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने भाजपचा महापौर आहे, तर आता भाजपच्या पाठिंब्याने राष्ट्रवादीचा सभापदी निवडण्याचा प्रयत्न होता. शिवसेनेने सुरवातीला विरोधात उमेदवार दिला आणि नंतर माघार घेतली.
यापूर्वीच्या निवडणुकीतही शिवसेनेचे उमेदवार योगिराज गाडे यांनी अशीच ऐनवेळी माघार घेतली होती. त्यावेळीही भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्या मनोज कोतकर यांची सभापतिपदी बिनविरोध निवड झाली होती. शिवसेनेकडून आघाडी एकसंघ असून वरिष्ठांच्या सूचनेनुसारच माघार घेतल्याचे आता सांगण्यात येत आहे. गाडे यांच्या माघारीच्यावेळीही असेच सांगण्यात आले होते. स्थायी समितीत सोळा सदस्य असून त्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे प्रत्येकी पाच, भाजपचे चार आणि काँग्रेस, बसपचे प्रत्येकी एक सदस्य आहेत. असे असूनही शिवसेनेला पदापासून दूर राहावे लागले आहे.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असूनही नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपसोबत उघड युती असल्याची तक्रार करायची आणि दुसरीकडे निवडणुकीत माघार घेऊन आघाडी एकसंघ असल्याचे सांगायचे, अशी स्थिती सध्या शिवसेनेची झाली आहे. राज्यात सत्ता आल्यानंतर पारनेरमध्ये मोठे राजकीय नाट्य घडले होते. तेथे शिवसेनेचे नगरसेवक राष्ट्रवादीने फोडले होते. त्यावेळी हा विषय थेट मातोश्रीपर्यंत गेला होता. अखेर वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन संबंधित नगरसेवकांना स्वगृही आणण्यात शिवसेनेने यश मिळविले होते. असे असले तरी नगरमध्ये मात्र राज्यातील सत्तेत कट्टर विरोध असेल्या भाजपसोबत राष्ट्रवादीची युती खपवून घ्यावी लागत असल्याचे दिसते. नगरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीने मिळून शिवसेनेची चांगलीच कोंडी केल्याचे दिसून येत आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times