निवडणूक उपायुक्तांना हटवाः तृणमूलची मागणी
तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून राज्याचे निवडणूक उपायुक्त सुदीप जैन यांना हटवण्याची मागणी केली आहे. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीवेळीही पश्चिम बंगालमध्ये जैन यांच्याकडेच पदभार होता. त्यावेळी लोकसभा निवडणुकीपूर्वी अमित शहांच्या रोड शोदरम्यान इश्वरचंद विद्यासागर यांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली होती. त्यावेळी जैन यांनी निवडणूक आयोगाला चुकीचा अहवाल सादर केला होता. या अहवालाच्या आधारावर दोन दिवस आधीच निवडणुकीचा प्रचार बंद करण्यात आला होता, असं ब्रायन यांनी म्हटलं आहे.
भाजप कार्यकर्त्यांनी विद्यासागर यांच्या मूर्तीची विटंबना केली. तरीही अमित शहा आणि त्यांच्या रोड शोविरोधात कुठलीही कारवाई केली गेली नाही. जैन यांचे वर्तन पूर्णपणे पक्षपाती होते, असं ब्रायन म्हणाले. यादरम्यान धर्मेंद्र प्रधान आणि भूपेंद्र यादव यांच्या नेतृत्वात भाजपच्या शिष्ठमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेतली. पश्चिम बंगालमधील महापालिकेवर अॅडमिनिस्ट्रेटर पदावर नियुक्त तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना हटवण्याची मागणी केली. ममता बॅनर्जींचे नेते निवडणुकीवर परिणाम करू शकतात, असं भाजपने म्हटलं आहे.
भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांना तृणमूलच्या आमदाराची धमकी
तृणमूलचे आमदार हमीदुल रहमान यांनी दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या नेत्यांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. खालल्या मीठाला जागा, असं आपले वडिलधारी मंडळी बोलून गेले आहेत. निवडणूक तृणमूल काँग्रेस जिंकेल आणि ममतादीदी पुन्हा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री होतील. यानंतर ज्यांनी पक्षाला दगा दिला आहे, त्यांना निपटून काढू. विश्वातघात करणाऱ्यांचा खेला होबे… (खेळ होणार), अशी धमकी त्यांनी दिली आहे.
शिवसेना निवडणूक लढणार नाही, ममतांना देणार पाठिंबा
पश्चिम बंगालमध्ये यावेळी निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा शिवसेनेने केली आहे. शिवसेना पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना पाठिंबा देईल, असं शिवसेनेचे नेते जाहीर केलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times