गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनी ब्लॉगच्या माध्यमातून गुगल मॅपला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ब्लॉगमध्ये पिचई यांनी गुगल मॅपचा प्रवास आणि आपले अनुभव सांगताना युजर्सचेही आभार मानले आहेत. गुगल मॅपला अधिक चांगले करण्यासाठी गुगलमधील इंजिनिअर मंडळींसह युजर्सचाही वाटा असल्याचेही त्यांनी सांगितले. भारतातील प्रवासात गुगल मॅपने अचूकपणे इच्छित स्थळी पोहचवले असल्याचे सांगितले. या प्रवासात टॅक्सी चालकाला रस्ता माहित नव्हता. मात्र, गुगल मॅपच्या मदतीने मी कॅबचालकाला रस्ता सांगितला असल्याची आठवण त्यांनी सांगितली. सुरुवातीला एका लहान टीमने सुरू केलेला गुगल मॅप आज एक मिशन झाले असल्याचे पिचई यांनी सांगितले.
गुगल मॅपमध्ये बदल
गुगल मॅपने १६ व्या वर्षात पदार्पण करताना लोगोत बदल केला आहे. गुगल मॅपमध्ये स्थानिक ठिकाणे, हॉटेल्स, जवळचे लँडमार्क सांगणारे एक्सप्लोर पर्यायही अधिक युजर्सफ्रेंडली करण्यात आला आहे. त्याशिवाय Commute या पर्यायाच्या माध्यमातून युजर्सला रिअल टाइम ट्राफिकसह कमी रहदारीचा मार्ग, जवळचा मार्ग सुचवण्यात येणार आहे. सध्या यातील काही पर्याय वापरात असेल तरी यात आणखी सुधारणा करण्यात आली आहे. Contribute या पर्यायाच्या माध्यमातून युजर्स एखाद्या स्थळाविषयी सहजपणे मॅपवर माहिती अपलोड करता येणार आहे. त्यामुळे इतर युजर्सनाही त्याचा फायदा होणार आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times