म. टा. प्रतिनिधी, पुणे: आपल्या लिखाणातून नर्मदा परिक्रमा लोकप्रिय करणारे आणि ” या पुस्तकासाठी ( ) अफाट लोकप्रियता मिळालेले लेखक जगन्नाथ कुंटे (वय ७७) यांचे ( ) ह्रदयविकाराच्या झटक्याने खासगी रुग्णालयात गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, हार्मोनियम वादक डॉ. चैतन्य कुंटे व लेखक कृष्णमेघ कुंटे हे दोन चिरंजीव, मुलगी, सुना, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. कुंटे यांनी २००६ मध्ये संन्यास घेतला. तेव्हापासून ते कुटुंबासोबत नव्हते. स्वामी अवधूतानंद या नावाने ते ओळखले जायचे.

कुंटे यांचा जन्म १५ मे १९४३ रोजी झाला. ते कतार येथे काही वर्षे वास्तव्यास होते. कुंटे यांनी खूपसे लिखाण केले; पण ते प्रकाशित झाले नाही. तीन नर्मदा परिक्रमा केल्यानंतर त्यांनी ‘नर्मदे हर हर’ हे पहिले पुस्तक लिहिले. प्राजक्त प्रकाशनाने २००५ मध्ये प्रकाशित केलेल्या या पुस्तकाला अफाट लोकप्रियता मिळाली. कुंटे यांच्या ओघवत्या आणि भारावून टाकणाऱ्या लेखनशैलीचे हजारो चाहते निर्माण झाले. पुढच्या परिक्रमेनंतर त्यांनी ‘साधनामस्त’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर २००६ मध्ये त्यांनी संन्यास घेतला. तेव्हापासून त्यांचे वास्तव्य वाचक व साधक यांच्या घरी, नदी किनारी किंवा आश्रमात असे. गेली पाच-सहा वर्षे त्यांचे वास्तव्य कोथरूड येथील प्रमोद कुलकर्णी यांच्या घरी होते. कुंटे यांना मधुमेहाचा त्रास होता. त्यांच्या इच्छेनुसार कुलकर्णी यांच्या कन्येने कुंटे यांच्या पार्थिवाला भडाग्नी दिला.

‘नर्मदे हर हर’ पुस्तकाची आता २४ वी आवृत्ती प्रसिद्ध होत आहे. त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या ‘साधनामस्त’, ‘नित्यनिरंजन’, ‘कालिंदी’, ‘धुनी’ या पुस्तकांच्या प्रत्येकी दहापेक्षा जास्त आवृत्त्या निघाल्या आहेत. नऊ वर्षांच्या खंडानंतर २०१९ मध्ये ‘प्रकाशपुत्र’ हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले. पहिले पुस्तक नागिणीच्या पिल्लासारखे असेल हे त्यांचे शब्द ‘नर्मदे हर हर’ पुस्तकाच्या लोकप्रियतेने खरे ठरले. पुरस्कारासाठी पुस्तक पाठवण्याला त्यांचा विरोध होता. त्यांची सर्व पुस्तके आम्ही प्रकाशित केली. एकाही पुस्तकाला पुरस्कार मिळालेला नाही. त्यांची राज्यभर व्याख्याने गाजली. एक पुस्तक वाचले की सगळी पुस्तके विकत घेणारा वाचक वर्ग त्यांनी वेगळ्या लेखन शैलीने तयार केला. त्यांच्या पुस्तकांना आजही जगभरातून मागणी आहे,’ असे प्राजक्त प्रकाशनाचे संचालक जालिंदर चांदगुडे यांनी सांगितले.

‘अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे दहा वर्षांपूर्वी टिळक स्मारक मंदिरात झालेल्या मुलाखतीला अफाट गर्दी झाली होती. काही प्रेक्षक टिळक रस्त्यावर थांबून होते,’ अशी आठवण गॅलरीचे संचालक रमेश राठिवडेकर यांनी सांगितली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here