मुंबई: सुधारीत नागरिकत्व कायद्याविरोधात नागपाडा येथे सुरू असलेल्या आंदोलनाचे छायाचित्रण करण्यासाठी गेलेल्या प्रेसफोटोग्राफर आशिष राजे यांना पोलिसांनी मारहाण केली. पोलिसांच्या मारहाणीत आशिष राजे यांना दुखापत झाली आहे. या मारहाणीचा पत्रकार संघटनांनी तीव्र निषेध नोंदवला आहे.

दिल्लीतील शाहीन बागप्रमाणे मुंबईतही नागपाडामध्ये सुधारीत नागरिकत्व कायद्याविरोधात ‘मुंबई बाग’ आंदोलन सुरू आहे. मागील १२ दिवसांपासून महिलांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचे छायाचित्रण करण्यास गेलेल्या आशिष राजे यांना दोन पोलिसांनी मारहाण केली. या आंदोलनाच्या छायाचित्रणासाठी विविध वृत्तपत्र, वृत्तसंस्थांचे फोटोग्राफर जमले होते. दरम्यानच्या काळात अल्पोपहारासाठी जाऊन आल्यानंतर आंदोलन स्थळी जाताना आशिष राजेंना पोलिसांनी ओळखपत्राची मागणी केली. त्यावेळी ओळखपत्र दाखवत असतानाच या पोलिसांनी विनाकारण मारहाण केली असल्याचे आशिष राजे यांनी सांगितले. मारहाण सुरू असताना काही अन्य फोटोग्राफर्सनी त्यांची सुटका केली व जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी नेले.

आशिष राजे यांना झालेल्या मारहाणीचा मुंबई प्रेस क्लबने निषेध नोंदवला आहे. या प्रकरणी गृहमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करून दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी प्रेस क्लबने केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीत स्वत: लक्ष देणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे. पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा मुंबई प्रेस क्लबसह टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशननेदेखील निषेध केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here