नवी दिल्लीः कच्च्या तेलाची निर्यात करणाऱ्या देशांची सर्वात मोठी संघटना आणि कच्चे तेलाचे उत्पादन करणाऱ्या देशांच्या समूहांनी गुरुवारी मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे या देशांकडून कच्चे तेल आयात करणाऱ्या भारतासह अनेक देशांचं धाबं दणाणलं आहे. कारण या देशांनी आणि संघटनेने कच्च्या तेलाच्या उत्पादनातील कपात आता एप्रिलपर्यंत वाढवली आहे. यामुळे इंधन दराचा भडका ( ) उडून आता हे दर नवा उच्चांक गाठण्याची चिन्हे आहेत. यामुळे ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारला मोठा झटका बसला आहे.

ओपेक (OPEC) आणि तेल उत्पादन करणाऱ्या देशांच्या निर्णयामुळे भारतातही इंधनाचे दर आणखी भडकण्याची शक्यता आहे. भारतातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. इंधनावरील करात कपात न केल्यास हे दर आणखी भडकणार आहेत.

पुढच्या महिन्यापासून तेल उत्पादक देश कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवतील अशी भारत सरकारला अपेक्षा होती. पण भारताच्या आपेक्षांना मोठा धक्का बसला आहे. आता सरकारसमोर इंधन दर आटोक्यात आणणं आणि त्यावरील करात कपात करण्यासाठी दबाव वाढला आहे.

करोनामुळे कच्च्या तेलाच्या मागणीत घट झाली आहे. यामुळे तेल उत्पादक देश आणि निर्यातदार कच्च्या तेलाचे उत्पादन कमी करण्यावर ठाम आहेत. ओपेक आणि संबंधित देशांनी किंमती स्थिर ठेवण्याचा दिलेला शब्द पाळावा, असं आवाहन भारताचे पेट्रोलियमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ओपेक आणि इतर देशांना त्यांच्या बैठकीपूर्वी केलं होतं. गेल्या महिन्यात ओपेकसह इतर संघटनांची बैठक झाली होती.

गेल्या वर्षाच्या तुलनेत कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. कच्चे तेल ६५ डॉरलर बॅरलच्या जवळ गेले आहे. सध्या एका बॅरलची किंमत ६३ डॉलरच्या वर आहे. यामुळे भारतातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर १०० रुपयांपर्यंत गेला आहे. तर मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर ९७.५७ रुपये आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर ८८.६० रुपये आहे.

इंधन दरवाढीमुळे केंद्र सरकारवर टीका होतेय. केंद्राने इंधनावरील कपात करावी, अशी मागणी जोर धरतेय. राजस्थान, आसाम, मेघालय आणि पश्चिम बंगालमध्ये गेल्या महिन्यात व्हॅटमध्ये १ ते ७ रुपयांपर्यंत कपात करण्यात आली. पण केंद्र सरकार आणि इतर राज्यांनी मात्र करात कपात केलेली नाही. इंधनावरील कर हा दराच्या तुलनेत ६० टक्क्यांवर आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here