शिवाजी माळी असे तक्रारदाराचे नाव आहे. ते जळगावचे आहेत. पश्चिम उपनगरमध्ये ते सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करतात. भुसावळ येथे मंगळवारी ते मुंबईला जाण्यासाठी पंजाब मेलमध्ये चढले. ही ट्रेन बुधवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास दादर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ६वर पोहोचली. माळी हे दरवाजात आले. फलाटावर एखादी कँटिन आहे का, तिथे काही खायला मिळते का, हे ते बघत होते. त्याचवेळी अन्सारी हा डब्यामध्ये घाईघाईत चढला. त्याचा धक्का माळी यांना लागला.
तू का डब्यामध्ये चढलास, असा प्रश्न माळी यांनी त्याला विचारला. पोलिसांच्या माहितीनुसार, अन्सारी हा कचरावेचक असून, तो डब्यात काही कचरा मिळतो का, हे बघण्यासाठी तो आतमध्ये गेला. त्यावेळी डब्यात चढताना माळी यांना त्याचा कोपरा लागला. त्यांनी जाब विचारला असता, दोघांमध्ये बाचाबाची झाली. अन्सारीने त्याच्याकडील स्क्रू ड्रायव्हरने माळींच्या मानेवर, पोटावर आणि दोन्ही हातांवर वार केले. त्यानंतर तो पसार झाला. पोलिसांनी माळी यांना रुग्णालयात दाखल केले.
या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आम्ही या प्रकरणी तपास करून अन्सारीला गुरुवारी स्वामीनारायण मंदिराजवळून अटक केली, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times