मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर अनिल देशमुख यांनी विधानसभेत निवेदन दिलं आहे. त्यात त्यांनी काही खुलासे केले आहेत. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूबद्दल प्राथमिक माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे. ‘मनसुख हिरेन यांच्या अंगावर जखमांच्या कोणताही खुणा नाहीयेत. त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येईल तसंच, ठाणे पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून महाराष्ट्र पोलीस या प्रकरणाचा तपास करण्यास सक्षम आहेत, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. तसंच, मनसुख हिरेन यांच्याकडे असलेल्या गाडीचे मालक ते नव्हते. त्यांच्या ताब्यात ती गाडी होती. गाडीच्या मालकानं पैसे थकवल्यामुळं मनसुख हिरेन यांनी ती गाडी त्यांच्या ताब्यात घेतली होती,’ असं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
विरोधकांकडून सचिन वाझे यांचं नाव या प्रकरणात सातत्याने येत आहे यावरही गृहमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे. ‘सचिन वाझे आता या प्रकरणाचा तपास करत नसून पीएसआय नितीन अलंकुरे हे या प्रकरणाचा तपास करत आहेत. सचिन वाझेंनी अर्णब गोस्वामींना अटक केली म्हणून तुमचा त्यांच्यावर राग आहे का?, असा सवालही गृहमंत्र्यानी विरोधकांना केला आहे. अन्वय नाईक प्रकरणी सचिन वाझेंनी अर्णब गोस्वामींवर कारवाई केली होती,’ असंही गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. गृहमंत्र्यांच्या या प्रश्नांवर सभागृहात काही काळासाठी गदारोळही झाला.
‘विरोधकांनी मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी हे प्रकरण एनआयएकडे वर्ग करावं, अशी मागणी केली आहे. यावरही गृहमंत्र्यांनी भाष्य केलं आहे. केंद्रीय संस्था असो किंवा राज्याची संस्था त्यांच्याबद्दलही आम्हाला आदर आहे. फक्त सुशांतसिंहच्या केसची मोठी चर्चा झाली. शेवटी ते प्रकरण सीबीआयकडे गेलं. आज सहा महिन्यांच्या अधिक महिने झालं. सुशांतसिंह प्रकरणाच्या तपासाचं काय झालं?,’ असा सवालही गृहमंत्र्यांनी केला आहे.
‘महाराष्ट्र पलिस असो किंवा मुंबई पोलिस असो त्यांचं जगात नाव आहे. त्यांनी गँगवॉर बंद केलं, शूट आउट बंद केलं त्या महाराष्ट्र पोलिसांवर तरी विश्वास ठेवा,’ असं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे.
सुधीर मुनगंटीवार यांचा गृहमंत्र्यांच्या वक्तव्यावर आक्षेप
विधानसभेचं काही महत्व आहे की नाही. गृहमंत्र्यांनी शब्द मागे घ्यावे किंवा तुम्ही ते रेकॉर्डवरुन काढावे. सचिन वाझे यांनी अर्णब गोस्वामीला अटक केली म्हणून त्याचं नाव घेतलं जाणं असं म्हणणं हे राजकीय, संविधानिक पाप आहे. नियमांचं पुस्तक पाहिलंत तर विरोधी पक्षनेतेपद मुख्यमंत्रीपदाच्या तोडीस तोड मानलं जातं. इतकी महत्वाची माहिती दिल्यानंतर गृहमंत्र्यांनी गांभीर्यानं उत्तर दिलं पाहिजे. एनआयएला चौकशी देण्यामागे कसली भीती आहे, असं मुनगंटीवार म्हणाले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times