म. टा. प्रतिनिधी, प्रतिनिधी, नागपूर: गडचिरोली पोलिसांतील सी-६० कमांडो आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत पोलिसांनी नक्षलवाद्यांचा शस्त्रास्त्र निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त ( ) केला आहे. यादरम्यान गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगड येथील नारायणपूरमध्ये कार्यरत इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिसमधील (आयटीबीपी) हेड कॉन्स्टेबल मंगेश हरिदास रामटेके (वय ४०) यांना ( ) वीरमरण आले. नक्षलवाद्यांनी पेरुन ठेवलेल्या भूसुरुंगाचा स्फोट झाल्याने त्यात ते शहीद झाले. शहीद जवान रामटेके हे भिवापूर येथील मूळ रहिवासी आहेत.

आयटीबीपीच्या ५३व्या बटालियनमधील हेड कॉन्स्टेबल शहीद मंगेश रामटेके यांचा जन्म २५ डिसेंबर १९८१ रोजी झाला. ते ६ जुलै २००७ रोजी आयटीबीपीमध्ये रुजू झाले. त्यांचे मुख्यालय आंध्रप्रदेशातील चित्तुर येथे आहे. मागील दोन वर्षांहून अधिक कालावधीपासून ते छत्तीसगडमध्ये कार्यरत होते. त्यांचे कुटुंबीय भिवापूरमधील सिद्धार्थनगरला राहतात. त्यांच्या पश्चात पत्नी राजश्री आणि मोठा आप्तपरिवार आहे. नारायणपूर येथील शासकीय रुग्णालयात शनिवारी सकाळी शवविच्छेदन होणार आहे. त्यानंतर पार्थिव अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीयांना सोपविण्यात येणार आहे.

जखमी उपचारासाठी नागपुरात

दरम्यान, नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत जखमी झालेल्या एक जवानाला उपचारासाठी नागपूरात हलविण्यात आले. कोपर्शीच्या जंगलात झालेल्या चकमकीत मोहन उसेंडी हा जवान जखमी झाला. कोठी येथून उपचारासाठी त्यांना हेलिकॉप्टरने गडचिरोलीत आणण्यात आले. सध्या नागपूरात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here